
तेल्हारा प्रतिनिधी :-
प्रापंचिक क्षेत्रातील एकांगी प्रेमाला रती तर, परमार्थिक क्षेत्रातील उभयांगी प्रीतीला भक्ती असे म्हणत असून ; एकांगी प्रेम हे बरेचदा आत्मघातास कारणीभूत होऊन, केवळ वर्तमानपत्राचा विषय होत असते. परंतु भगवान शुकदेव तथा देवर्षी नारदांच्या गुरु असणाऱ्या भक्त शिरोमणी पतिव्रता सुरत्न गोपिका आणि लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची उभयांगी प्रिती हा श्रीमद्भागवत महापुराण नामक ग्रंथाचा नुसता विषय नाही तर , प्रत्यक्ष आत्माच आहे. तद्वत १९३८ ला श्रीक्षेत्र आळंदी स्थित भगवान श्री ज्ञानोबारायांच्या समाधीवर पवित्र असणारी तुळशीमाळा ठेवून स्वतःच्या गळ्यात घालून घेत त्यांनाच श्रीगुरु मानून ‘ ज्ञानेश्वरदास ‘ नाव धारण करून , गद्यपद्यात्मक तब्बल ३७ ग्रंथाची निर्मिती करणारे संत श्री वासुदेवजी महाराज हे ज्ञानेशांवर एकांगी प्रेम करणारे नव्हे तर,भगवान श्री ज्ञानेशांनाही नितांत प्रिय असणारे संत होत तद्विषयक थोडे तात्विक चिंतन.
भारतीय पौराणिक इतिहासामध्ये ध्रुव बाळा प्रमाणे भगवद्दर्शनाची तीव्र इच्छा अंत:करणामध्ये निर्माण झाल्यानंतर ” नारदो देवदर्शन : ” या नियमाने भगवदर्शनाची नांदी म्हणून प्रथम नारदांचे दर्शन होते. तर संत दर्शनाची लालसा असणाऱ्या साधकांना प्रथम भगवंत दर्शन देत असतात. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दर्शनाच्या अभिलाषेनी तब्बल ४२ दिवस उपोषण करणाऱ्या निळोबारायांना भगवान दर्शन देण्याकरिता आले असतांना ” निळा म्हणे आम्ही नोळखुचि देवा l तुकयाचा धांवा करीतसो ll” असे ठणकावून सांगितल्याने ,भगवंतांना आल्यावाटे परत जाऊन जगद्गुरुंना त्यांना अनुग्रहीत करण्याकरिता वैकुंठाहून परत पाठवावे लागेल.
संतश्री वासुदेवजी महाराज हे पंढरी क्षेत्रात आषाढी महावारी निमित्त आले असतांना २.७.२००९ ला भगवान श्री ज्ञानोबारायांची अगदी आतूरतेने वाट पाहत होते . तेव्हा भगवान पांडुरंगांनी त्यांना भेट देणे आवश्यक होते. परंतु निळोबारायांचा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर असल्याने, पुन्हा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ते माऊलीला वाखरीला सामोरा गेलेत व तुमचा प्रिय भक्त ज्ञानेश्वरदास तुमची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे असे त्यांना सांगितले. तेव्हा माऊलींनी विचार केला की, भक्त जरी आपला असला तरी रक्त मात्र तुकाराम महाराजांचे असल्याने त्यांना सुद्धा सोबत घेतले . हे दोघेही घाईने निघालेत हे पाहून उर्वरित सर्व संत अगदी घाई घाईने पंढरीक्षेत्रात येते झाले. माऊलींच्या सोहळ्याच्या इतिहासातील कदाचित तो पहिला दिवस असावा की , माऊली सर्व संतांनिशी साडेनऊच्या दरम्यान पंढरीक्षेत्रात येऊन पोहोचले. यांनी सुद्धा माऊली आल्याशिवाय देहत्याग केला नाही , असे म्हटल्यापेक्षा आपल्या प्रिय भक्ताच्या प्राणोत्क्रमणाच्या वेळी वारकऱ्यांच्या रूपात प्रत्यक्ष माऊलींनीच हजर होऊन उभयांगी प्रीतीची साक्ष दिली. एवढेच नाही तर , आषाढी एकादशीच्या पर्वकाळावर संपन्न होत असणाऱ्या त्यांच्या प्रत्येक पुण्यतिथीला नगर प्रदक्षिणेच्या वेळी भगवान ज्ञानेशादि सर्व संतांची मांदियाळी स्वतःचे रथ सोडून ज्ञानेश प्रिय संत ज्ञानेश्वरदासांच्या अंत्यविधी स्थळी अर्थातच माता चंद्रभागेच्या वाळवंटात आजही प्रत्यक्ष येऊन अभिषेक व आरती सह सर्व विधी करून त्यांच्या प्रतीच्या उभयांगी प्रीतीचे समग्र वारकरी संप्रदायाला दर्शन घडविता व ” यावद्चंद्रदिवाकरौ ” अखंड घडवित राहतील यात तीळ मात्र शंका नाही. अशा ज्ञानेश प्रिय संत ज्ञानेश्वरदास उपाख्य वासुदेवजी महाराजांच्या १०९ व्या अवतिर्णोत्सवानिमित्य त्यांचे चरणी हे वाक्पुष्प समर्पित.आतां विश्वात्मकु हा माझा l स्वामी श्रीनिवृत्तिराजा l तो अवधारु वाक्यपूजा l ज्ञानदेवो म्हणे ll
श्री ज्ञानेश्वरदासानुदास.
भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ. श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.