
तेल्हारा प्रतिनिधी :-
कृष्णावतारात गोकुळ लीला करीत असतांना भगवान श्रीकृष्णाने अठरा पगड जातींच्या बालगोपाळांना एकत्रीत करून त्यांच्यासोबत नाना प्रकारचे मैदानी खेळ खेळून त्यांचे मन, मेंदू व मनगट मजबूत करण्याचे काम केले. किंबहुना या कमजोर व अबोध बालकांना संघटित व सक्षम करून या संघटनेच्या माध्यमातूनच बलाढ्य असणारी कंसशाही पालथी घातली. एकूणच खेळ हे सांघिक कृत्य असल्याने संघटन मजबूत होते. मैदानी खेळ खेळणाऱ्या मध्ये संघटन कौशल्य विकसित होऊन तो नेतृत्व करायला लागतो असे स्वानुभवपूर्ण मत माजी क्रिडा राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे यांनी मांडले.
ते आज श्री संत वासुदेव जी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीवरील खेळांपेक्षा मैदानी खेळ किती महत्त्वाचे आहे याची मार्गदर्शन करीत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की मुलांनी खेळणे वाईट नाही फक्त ते अभ्यासाच्या वेळेत नसावे. अभ्यास व इतर कामे यांच्या माध्यमातून आलेला ताण कमी करण्याचे खेळ ही एक प्रभावी साधन आहे. मैदानी खेळ हे विजय आणि हार याचा सामना करण्यास सक्षम बनवितात. तसेच पराभव सुद्धा सानंद पचविण्याचे सामर्थ्य प्रदान करतात. एवढेच नाही तर त्यामुळेच एकाग्रता , जिद्द , विजय प्राप्ती करता लागणारी चिकाटी , बुद्धी कौशल्य , नियोजनबद्धता , पारख करणे आदि सद्गुण वाढीस लागतात. मैदानी खेळ हेच बालकांच्या चंचलत्वाला चपळत्वात परिवर्तित करून त्याच्या मासपेशी मजबूत करून, त्याचा उत्साह वाढवित शारीरिक विकासाकरिता कारणीभूत होतात. म्हणून त्यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांकरीता आंब्याचा रस तसेच लाठीकाठी लेझीम व मल्लखांब शिकविण्याकरिता दोन प्रशिक्षक ( वस्ताद ) आणून त्यांनी स्वतःही विद्यार्थ्यांना शिकविले . तसेच संस्कार शिबिरातील बारावी कपिल चोपडे, अथर्व धांडे, प्रज्योत शेळके , कृष्णा रोकडे आणि दहावीच्या परीक्षेत चांगले गुण प्राप्त केलेल्या गजानन सपकाळ, अनुज पवार, अभय घाटे, आदित्य लव्हाळे, सुमित राखोंडे, हर्षल जुनारे, तत्वम खारोडे, हर्षल लासुरकार , सोहम अंबडकर , सागर सोळंके व कु. कोमल रावणकार, दिव्या तळोकार आदि गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थिनींना युवकांकरता स्वामी विवेकानंद नामक पुस्तक देऊन हृद्यसत्कार सुद्धा गुलाबरावजी गावंडे यांच्या हस्ते करण्यात आल्याचा ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.