तेल्हारा (प्रतिनिधी):
अडगाव बुद्रुक ते मालठाना मार्गावर हिवरखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत ४० गोवंशाची कातडी जप्त केली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, केवळ कातडी पकडून पोलिसांनी आपली पाठ थोपटून घ्यावी की यामागील अंगावर काटा आणणाऱ्या सत्यतेचा शोध घ्यावा, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या कारवाईने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कौतुकापेक्षा प्रश्नांचा भडिमार अधिक होत आहे.
केवळ कातडी सापडली, ‘रक्त’ सांडणारे कुठे?
पोलिसांनी ४० गोवंशाची कातडी पकडली, ही वस्तुस्थिती आहे. पण प्रश्न असा उभा राहतो की, एकाच वेळी ४० जनावरांची कत्तल झाली कुठे? इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होत असताना पोलिसांचे गुप्तचर खाते काय करत होते ? कातडी जप्त करणे हा तपासाचा शेवट नसून ती केवळ एक सुरुवात आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि ही कातडी नेमकी कुठे नेली जात होती, याचा उलगडा करण्यात पोलीस अद्यापही अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
कत्तलखान्याचा पत्ता लागेना!
एवढ्या मोठ्या प्रमाणात कातडी उपलब्ध होण्यासाठी नक्कीच परिसरात किंवा आसपासच्या भागात एखादा मोठा अवैध कत्तलखाना कार्यरत असण्याची दाट शक्यता आहे. ४० जनावरांचे रक्त सांडले, त्यांचे मांस विकले गेले, पण पोलिसांना फक्त कातडी साठवलेले वाहन किंवा साठा सापडतो, हे अनाकलनीय आहे. तो कत्तलखाना नेमका कुठे आहे? तिथे कोणाचे अभय लाभले आहे? हे शोधण्याचे धाडस पोलीस दाखवतील का? पोलीस नेमके कोणाला वाचवतायत?
या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि या अवैध धंद्याचा ‘किंगपिन’ अद्यापही पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. केवळ वाहकावर किंवा छोट्या वाहनांवर कारवाई करून हे प्रकरण वेगळ्या दिशेने तर जात नाही ना, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
”४० गोवंशाची कातडी सापडणे ही छोटी घटना नाही. हे एक मोठे रॅकेट असून याचे धागेदोरे खूप खोलवर आहेत. पोलिसांनी जर मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक केली नाही, तर जनतेचा कायद्यावरील विश्वास उडेल.” या प्रकरणाचा सखोल तपास करून कत्तलखान्याचा शोध घ्यावा.
मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाई करून त्याचे नाव जाहीर करावे.
हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी लगाम लावावा.
हिवरखेड पोलीस केवळ कातडी जप्त करण्याच्या ‘कागदी’ कारवाईवर समाधान मानतात की या क्रूर गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.