
धिरज संतोष बजाज हिवरखेड प्रतिनिधी :-
काशीत वसे विश्वेश्वर..तळेगावात वसे सोमेश्वर.
पश्चिम वाहिनी पिंड आहे. या दोनच तीर्थस्थळावर.
उपरोक्त म्हणीप्रमाणे तळेगाव बाजार येथे पश्चिम वाहिनी, शिवलिंग असलेले प्रसिद्ध श्री.सोमेश्वराचे मंदिर आहे. या मंदिरात महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांची उपस्थिती असते. तळेगाव बाजार येथील महाशिवरात्री उत्सव पुरातन काळापासून मुख्यता तीन दिवसाचा असतो.
पहिला दिवस महाशिवरात्री निमित शिवपुजन, दुसऱ्या दिवशी श्री. सोमेश्वराला कबुल केलेले नवस म्हणजे लहान मुलांचे लोटांगन आणि दुपारी रथ यात्रा प्रारंभ त्यानंतर तिसऱ्या दिवशी महाप्रसादाने सांगता असे उत्सवाचे स्वरूप असते. या वर्षी दि. 15/02/2025 महाशिवरात्री निमित्त श्री.सोमेश्वर मंदिरात महापूजा होऊन दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांना गावाकऱ्यांच्या व दानशूर यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे या फराळासोबतच एका मेंढपाळाकडून तब्बल सव्वा लक्ष रुपयांच्या काजूकतलीचा प्रसाद सोमेश्वराच्या भक्तांना वितरित करण्यात आला . 16 फेब्रुवारी ला ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाची पूजा व दुपारी संस्थान परिसरातून श्रीं सोमेश्वरांच्या रथ मिरवणुकीला प्रारंभ होऊन अर्ध्या गावातुन प्रदक्षिणा करून पूर्वीपासून निश्चित केलेल्या जागी रथ मिरवणुक विसावा घेईल आणि 17 फेब्रुवारी ला काल्याचे किर्तन आणि भव्य यात्रेचे आयोजन करून दुपारी उर्वरित रथ मिरवणुकीस प्रारंभ होऊन याच दिवशी संध्याकाळी संस्थानच्या आवारात दहीहंडी आणि भव्य महाप्रसादाने महाशिवरात्री उत्सवाची सांगता होईल.
महाशिवरात्री उत्सवा निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयी करीता ऑटो चालक आणि इतर वाहन धारकांकडून वाहन व्यवस्था करण्यात आली होती. हिवरखेड, गोर्धा फाटा अडगाव बु. खंडाळा फाटा येथून वाहन व्यवस्था उपलब्ध आहे.
17 फेब्रुवारीला दहीहांडी नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन केले असून महाशिवरात्री पर्वा निमित्त श्री.सोमेश्वर संस्थान तळेगाव बाजार येथे श्री.सोमेश्वर महाराजांचे हजारो भाविकांनी दिवसभर दर्शन घेतले. आता 17 तारखेला दहीहंडी व महाप्रसादाकरिता पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष संतोष खारोडे, तसेच सर्व विश्वस्त मंडळ आणि गावकरी मंडळींनी केले आहे.
“ब” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा देण्याची मागणी
पुरातन स्वयंभू सोमेश्वर संस्थान तळेगाव बाजार हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे महाशिवरात्री आणि पोळ्याच्या यात्रा भव्य स्वरूपात भरतात. तसेच वर्षभरात लक्षावधी भाविक येथे दर्शनासाठी हजेरी लावत असतात. संस्थांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला असून भाविकांची संख्या बघता सोमेश्वर संस्थानला आता शासनाने त्वरित ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन भरिव शासकीय निधी आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी एकमुखी मागणी ग्रामस्थ, भाविकांतर्फे आणि विश्वस्त समिती कडून अध्यक्ष संतोष खारोडे यांनी केली.