
धिरज संतोष बजाज हिवरखेड प्रतिनिधी :-
काशीत वसे विश्वेश्वर..तळेगावात वसे सोमेश्वर.
पश्चिम वाहिनी पिंड आहे.. या दोनच तीर्थस्थळावर…
उपरोक्त म्हणीप्रमाणे तळेगाव बाजार येथे पश्चिम वाहिनी, शिवलिंग असलेले प्रसिद्ध श्री.सोमेश्वराचे मंदिर आहे. या मंदिरात महाशिवरात्री निमित्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांची उपस्थिती असते. तळेगाव बाजार येथील महाशिवरात्री उत्सव पुरातन काळापासून तीन दिवसाचा असतो.
पहिला दिवस महाशिवरात्री निमित शिवपुजन, दुसऱ्या दिवशी श्री. सोमेश्वराला कबुल केलेले नवस म्हणजे लहान मुलांचे लोटांगन आणि दुपारी रथ यात्रा प्रारंभ त्यानंतर तिसऱ्या दिवशी महाप्रसादाने सांगता असे उत्सवाचे स्वरूप असते. या वर्षी दि. 15/02/2025 महाशिवरात्री निमित्त श्री.सोमेश्वर मंदिरात महापूजा होऊन दर्शनासाठी पंचक्रोशीतील उपस्थित भाविक भक्तांना गावाकऱ्यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात येईल. 16 फेब्रुवारी ला ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाची पूजा व दुपारी संस्थान परिसरातून श्रीं सोमेश्वरांच्या रथ मिरवणुकीला प्रारंभ होऊन अर्ध्या गावातुन प्रदक्षिणा करून पूर्वीपासून निश्चित केलेल्या जागी रथ मिरवणुक विसावा घेते.
17 फेब्रुवारी ला काल्याचे किर्तन आणि भव्य यात्रेचे आयोजन करून दुपारी उर्वरित रथ मिरवणुकीस प्रारंभ होऊन याच दिवशी संध्याकाळी संस्थानच्या आवारात दहीहंडी आणि भव्य महाप्रसादाने महाशिवरात्री उत्सवाची सांगता होईल.
महाशिवरात्री उत्सवा निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयी करीता ऑटो चालक आणि इतर वाहन धारकांकडून वाहन व्यवस्था करण्यात आली असून हिवरखेड, गोर्धा फाटा अडगाव बु. खंडाळा फाटा येथून वाहन व्यवस्था उपलब्ध आहे.
17 फेब्रुवारीला दहीहांडी नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन केले असून महाशिवरात्री पर्वा निमित्त श्री.सोमेश्वर संस्थान तळेगाव बाजार येथे श्री.सोमेश्वर महाराजांचे दर्शन आणि महाप्रसादाकरिता पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष संतोष खारोडे, तसेच सर्व विश्वस्त मंडळ आणि गावकरी मंडळींनी केले आहे.