
सर्वसामान्यांच्या बुद्धीस अनाकलनीय घटना ज्यामध्ये ग्रंथीत केलेल्या असतात त्याला चरित्र असे म्हणतात . वारकरी संतांचे चरित्र कळण्याकरिता केवळ तर्काचा आधार न घेता किंवा ऐतिहासिक कागदी घोडे न नाचवता साहित्यिक तथा संशोधकांनी त्या संतांनी निर्माण केलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी , भागवत व गाथा या वारकरी प्रस्थांनत्रयीचा आधी सखोल अभ्यास करावा . कारण ते ग्रंथ म्हणजे केवळ यमक जोडून निर्माण केलेले काव्य नसून , ते प्रत्यक्ष त्यांचे वांङ्मयीन स्वरूप आहेत. म्हणून प्रत्यक्ष वांङ्मयाभ्यासाशिवाय संत चरित्र कळणे अशक्य असल्याचे सप्रमाण अभ्यासपूर्णमत भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज संत श्री वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानयज्ञ सप्ताहातील द्वितीय पुष्प गुफिंत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वारकरी संत वाङ्ममय हे शब्दाच्या पंखावर बसून कल्पनेच्या आकाशात केलेले स्वैर उड्डाण नसून, ते संतांचे प्रत्यक्ष शब्दचित्र असल्याने ज्ञानोबाराय कळावे याकरिता ज्ञानेश्वरी व तुकोबाराय कळून घ्यायचे असतील तर त्यांची गाथा अभ्यासने गरजेचे आहे. वारकरी संप्रदायाचा देव जेवढा मोठा आहे त्याहीपेक्षा त्यास आपल्या पोटात साठविणारे व आज्ञेत वागविणारे संत मोठे आहेत. याची प्रत्यक्ष प्रचिती त्यांच्या साहित्यातून आपणास दिसून येते. विद्वानांची डोके चालतात परंतु चालण्याचे काम मात्र पायालाच करावे लागते. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देवा ! तू जरी डोक असला तरीही आम्ही मात्र पाय आहोत .” हेम अळंकार नामीं l तुका म्हणे तैसे आम्ही ll “अर्थात तू जर शुद्ध सोने असशील तर, आम्ही त्यापासून बनलेले अलंकार आहोत. सोन्याला किंमत आहे परंतु शोभा नाही . म्हणून सोन्याला शोभा यावी असे वाटत असेल तर , त्याचे अलंकार बनले पाहिजेत. आणि अलंकाराला किंमत येण्याकरिता ते सुद्धा सोन्याचे असले पाहिजेत. म्हणून हे देवा ! तुझ्यात आणि माझ्यात वास्तविक पाहता कुठलाही भेद नसून , जगात केवळ प्रेम सुख वाढविण्याकरिता आम्ही कल्पितभेद मानून तू देव आणि आम्ही भक्त या भूमिकेतून तुझी मनोभावे सेवा करीत असतो. याहीउपर असलाच भेद तर तो फक्त नावापुरताच जसे तू पांडोबा तर आम्ही ज्ञानोबा , एकोबा , तुकोबा एवढाच फरक आहे. अर्थात अशा प्रकारचा त्यांचा अधिकार कळण्याकरिता त्याने निर्माण केलेले अभंगरूप साहित्य आधी अभ्यासणे गरजेचे आहे असेही महाराजांनी सांगितल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.