
अंजनगाव तालुका प्रतिनिधी :-अनंता मते
अंजनगाव सुर्जी: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी महाविद्यालय, अमरावती येथे आंतरविद्यापीठ स्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धाचे आयोजन दि. १ ते १० फेब्रुवारी २०२६ दरम्यान करण्यात आले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूमध्ये स्थानिक श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी येथील ओम सोळंके, दिपेश वानखडे, कु. साक्षी वानखडे, कु. अर्पिता गायगोले , कु. नितु नेमाडे आदी विद्यार्थ्यांची यशस्वीरीत्या सहभाग नोंदवत सॉफ्टबॉल स्पर्धेत विद्यापीठ तसेच महाविद्यालयाकरिता सुवर्ण पदक पटकावले. सदर चमूचे व्यवस्थापक म्हणून डॉ.समीर बिजवे (संचालक, शारीरिक शिक्षण विभाग, श्रीमती रा.सा.महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी) म्हणून कार्यभार सांभाळला. श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयतर्फे सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच चमू व्यवस्थापक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.कविता मालोकार, प्रमुख पाहुणे श्री.नितीन गोमाशे (अधिक्षक), प्रा.डॉ.सत्येंद्र गडपायले, डॉ.सुवर्णा झिलपे व श्री. प्रशांत नांदुरकर आदींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान सुवर्ण पदक विजेते विद्यार्थी ओम सोळंके, दिपेश वानखडे, साक्षी वानखडे, अर्पिता गायगोले, नितु नेमाडे तसेच चमू व्यवस्थापक डॉ.समीर बिजवे (संचालक, शारीरिक शिक्षण विभाग) आदींचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. समीर बिजवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या सुर्वणपदकाचा फायदा सरकारी नोकरी प्राप्त करण्याकरिता कसा करता येईल तसेच आगामी राज्यस्थरीय तसेच राष्ट्रीयस्थरीय सॉफ्टबॉल स्पर्धांविषयी विद्यार्थ्यांना सराव करण्याकरिता प्रेरीत केले. कार्यक्रमादरम्यान अध्यक्षा डॉ.मालोकार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सदर पाच सुवर्ण पदके मिळविने हे महाविद्यालयाकरिता ऐतिहासिक सुवर्ण क्षण आहे. महाविद्यालयांतील इतर विद्यार्थ्यांनीसुद्धा यापासून बोध घ्यायला हवा, असे उदगार त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसमवेत हितगुज साधताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.महेंद्र गिरी, आभार प्रदर्शन डॉ.नविता मालाणी यांनी केले. कार्यक्रमाला प्रा.भारती कोरडे, प्रा.आशा बाणाईत, डॉ.नितीन सराफ, डॉ.सतिश मार्डीकर, डॉ.राजेंद्र मानकर, डॉ.अनिकेत भुयार तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.