
राजू भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी:-
मेळघाटात एल्गार : मग्रारोहयोचे काम १५ दिवसांपासून पूर्णपणे बंद, मिळाले केवळ आश्वासन
अमरावती जिल्हा चिखलदरा तालुका मेळघाटातील आदिवासी मजुरांच्या हाताला मिळणारे मग्रारोहयोचे काम गेल्या १५ दिवसां पासून पूर्णपणे बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाकडून वारंवार आश्वासन मिळूनही समस्या सुटत नसल्याने अखेर जय आदिवासी समाज विकास संघटनेने चिखलदरा तालुक्यातील हिरदामल येथे ६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले. मग्रारोहयो अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी २३ जानेवारी २०२६ पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. याचा थेट फटका मेळघाटातील गोरगरीब आदिवासी मजुरांना बसला असून जॉब कार्डधारकांची कामे बंद झाली आहेत. होळीचा सण तोंडावर असताना खिशात पैसे नसल्याने मजूर वर्ग चिंतेत असून पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर सुरू झाले आहे.
हिरदामल येथे आंदोलनाची धार
या उपोषणात संघटनेचे अध्यक्ष गाणुजी सावलकर, सचिव दीपक कासदेकर आणि सहसचिव उमेश जांभे यांच्यासह अनेक मजूर सहभागी झाले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाही मेळघाटातील २० टक्के आदिवासी समाज आजही मूलभूत सोयी-सुविधां पासून वंचित आहेत, असा संताप उपोषणक र्त्यांनी व्यक्त केला आहे.
आंदोलकां च्या प्रमुख मागण्या :
काम आणि मजुरी : मग्रारोहयोची कामे
तत्काळ सुरू करून मजुरांना वेळेवर मजुरी द्यावी.
आरोग्य व रस्ते : मेळघाटात ब्लड बैंक
सुरू करावी आणि खराब रस्त्यांमुळे होणारे माता-बाल मृत्यू रोखण्यासाठी सिमेंट रस्ते बांधावेत.
वीज आणि पाणी:वीज नसलेल्या २२ गावांत वीजपुरवठा करावा आणि ‘हर घर नळ’ योजनेतून प्रत्येकी ५५ लीटर पाणी उपलब्ध करून द्यावे अशा विविध मागण्या आहेत.