
तेल्हारा प्रतिनिधी :-
मनब्दा येथे ३६ व्या अकोला जिल्हा स्काऊट-गाईड मेळाव्याचा विधिवत समारोप; शिस्त, सेवा व स्वावलंबनाचा संदेश
मनब्दा (ता. तेल्हारा) येथील श्री गुलालशेष महाराज संस्थान परिसरात भारत स्काऊट-गाईडच्या ३६ व्या तीन दिवसीय अकोला जिल्हा मेळाव्याचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या समारोप सोहळ्याचे अध्यक्षस्थान विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, “स्काऊट चळवळ ही देशासाठी आदर्श नागरिक घडविण्याचा कारखाना आहे. इथे मिळणारे संस्कार आयुष्यभर दिशा देतात.”
शालेय शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अकोला यांच्या सहकार्याने ४ ते ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हा तीन दिवसीय जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे एक हजार स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांनी मेळाव्यात सहभाग नोंदवून शिस्त, सेवा, स्वावलंबन आणि संघभावनेचे धडे आत्मसात केले.
मान्यवरांचे मेळावास्थळी आगमन होताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठारी कॉन्व्हेंट, अकोला येथील स्लोमार्च पथकाने मानवंदना देत स्वागत केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघजाळी, स्व. बाबासाहेब खोटरे विद्यालय, शिरसोली तसेच सिद्धेश्वर विद्यालय धाबा येथील स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी मनब्दा गावच्या सरपंच सौ. सीमा पाथ्रीकर, उपसरपंच शेषराव पोहरकर, श्री गुलालशेष महाराज संस्थानचे अध्यक्ष विजय पाथ्रीकर, उपाध्यक्ष सुभाष शिखरे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग पाथ्रीकर व विश्वासराव पाथ्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपक्रमशील शिक्षक तुळशीदास खिरोडकर, कलाशिक्षक आशिष चौथे तसेच राष्ट्रपती स्काऊट पुरस्कार प्राप्त स्वप्निल थोरात यांनी समयोचित मनोगते व्यक्त केली.
आपल्या मार्गदर्शनात आ. मिटकरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वयंशिस्त आणि स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले. “मोबाईलच्या युगात स्वतःवर नियंत्रण ठेवणे ही खरी स्वयंशिस्त आहे. स्वतःची कामे स्वतः करण्याची तयारी म्हणजे स्वावलंबन. हेच गुण आयुष्याला उंचीवर नेतात,” असे ते म्हणाले. स्काऊट-गाईड चळवळ विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनविण्याचे कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मेळाव्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्काऊट-गाईड पथकांचा तसेच आयोजनात सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आ. अमोल मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (स्काऊट) श्रीकृष्ण डांबलकर यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हा संघटक (स्काऊट) किरण लहाने यांनी केले.
मेळा व्याच्या यशस्वीते साठी मेळावा प्रमुख (स्काऊट विभाग) राजेश पातळे, मेळावा प्रमुख (गाईड विभाग) श्रीमती सुषमा देशमुख, जिल्हा संघटक (गाईड) श्रीमती जयमाला जाधव, केंद्रप्रमुख विशाल घोगले, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष विलास खुमकर, मुख्याध्यापक अविनाश देशमुख तसेच जिल्हा संस्थेचे पदाधिकारी पी. जे. राठोड, उमेश तेलगोटे, बबलू तायडे, पंकज देशमुख, मनोज बगले, सविता शेवतकर, स्मिता डांबलकर, ममता नेमाडे, अशोक राठोड, रमेश जाधव, राजेश सिरसाट, विजय जितकार आणि कार्यालयीन कर्मचारी संतोष भेंडेकर, ज्योती इंगळे, सुबोध शेगावकर, विक्रम काळे यांनी परिश्रम घेतले.