
तेल्हारा ता. (प्रतिनिधी):नंदकिशोर नागपुरे
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यात स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने आकांक्षा टायपिंग अँड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, हिवरखेड यांच्या वतीने स्थानिक जि. प. महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मराठी आणि उर्दू अशा दोन्ही माध्यमांच्या एकूण २७० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य सय्यद कमर अली होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून आकांक्षा टायपिंग इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. मयूर लहाने उपस्थित होते. यावेळी डॉ. लहाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पटवून दिले व त्यांचे मनोबल वाढवले.
या स्पर्धा परीक्षेसाठी उपक्रम प्रमुख म्हणून मराठी माध्यमासाठी सौ. घुंगड मॅडम तर उर्दू माध्यमासाठी जफर अहमद सर यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही माध्यमांतील प्रथम तीन क्रमांकांच्या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.या परीक्षेत दोन्ही माध्यमांतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
मराठी माध्यमातुन दिव्या कैलास ढगे (प्रथम क्रमांक), अश्विनी धम्मपाल इंगळे (द्वितीय क्रमांक), भावना धनराज बोदळे (तृतीय क्रमांक) तसेच उर्दू माध्यमातुन इम्तियाज परवीन शेख नजाकत (प्रथम क्रमांक), जोया तेहरीन इस्माईल खान (द्वितीय क्रमांक), आशिया खातून जमीर खान (तृतीय क्रमांक) पटकावला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जफर अहमद सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सौ. घुंगड मॅडम यांनी मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अतीकुरहमान, अब्दुल अजीम, जाकीर नोमानी, मो. जुबेर, तौसीफ अहमद, कौसर नसरीन, नबील फरहान, तुलसीदास खिरोडकर, भालचंद्र विरघट, कल्पना राऊत, जय इंगळे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि परिसरातील शिक्षणप्रेमींनी आकांक्षा टायपिंग इन्स्टिट्यूट व विद्यालयाचे कौतुक केले आहे.