तेल्हारा प्रतिनिधी :-
अकोला जिल्ह्यातील स्काउट व गाईड चळवळीला नवी ऊर्जा देणारा ३६ वा स्काउट-गाईड जिल्हा मेळावा ४ ते ६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान उत्साहात आयोजित करण्यात येत आहे. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अकोला आणि अकोला भारत स्काउट्स-गाईड्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा श्री. गुलाबशेष महाराज संस्थान, मनब्दा (ता. तेल्हारा, जि. अकोला) येथे पार पडणार आहे.
या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध शाळांमधील स्काउट्स व गाईड्स सहभागी होणार असून शिस्त, स्वावलंबन, देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शिबिरातील जीवनकौशल्ये, समूहकार्य, साहसी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे.
मेळा व्याचा उद्घाटन समारंभ ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता होणार असून अध्यक्षस्थानी मा. आकाश फुंडकर (मंत्री कामगार, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अकोला) राहणार आहेत. उद्घाटक म्हणून आ. रणधीर सावकर उपस्थित राहतील. विशेष प्रमुख अतिथी म्हणून आ. प्रकाशभाऊ भारसाकळे, आ. अमोल मिटकरी आणि आ. किरण सरनाईक यांची उपस्थिती लाभणार आहे.
जिल्हा धिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अनिता मेश्राम तसेच जिल्हा परिषद व विविध विभागांतील मान्यवर अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यात पहिल्या दिवशी सायंकाळी शेकोटी कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी शोभायात्रा आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. समारोप समारंभ ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता होणार असून अध्यक्षस्थानी सुमंत सोळंके (भा.प्र.से.) राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून विविध प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहतील.
मेळाव्याचे प्रमुख उपक्रम म्हणून शेकोटी, शोभायात्रा, जीवन शिबिर, विविध कौशल्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, सेवा भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव दृढ होईल, असा विश्वास शिक्षणाधिकारी तथा अकोला जिल्हा मुख्य आयुक्त स्काउट-गाईड रतनसिंग पवार यांनी व्यक्त केला आहे.
मेळावा थोडक्यात
मेळावा ३६ वा स्काउट-गाईड जिल्हा मेळावा
दिनांक ४ ते ६ फेब्रुवारी २०२६
ठिकाण श्री. गुलालशेष महाराज संस्थान, मनब्दा, ता. तेल्हारा, जि. अकोला
आयोजक शिक्षण विभाग जि.प. अकोला व भारत स्काउट्स-गाईड्स अकोला
उद्घाटन ४ फेब्रुवारी, दुपारी २.३० वा.
समारोप ६ फेब्रुवारी, सकाळी ११.३० वा.
प्रमुख उपक्रम शेकोटी, शोभायात्रा, जीवन शिबिर, कौशल्य स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम