
तेल्हारा प्रतिनिधी :-
तेल्हाराः जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त तेल्हारा शहरात आज भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. या पावन प्रसंगी सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण शिवलीलाताई पाटील (बार्शी, सोलापूर) यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांद्वारे समाजाला समता, मानवता व सत्याचा संदेश देणाऱ्या शिवलीलाताई पाटील यांच्या प्रभावी वाणीतून आज तुकोबांचे विचार रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यांच्या कीर्तनामुळे परिसरात भक्तीचा जागर होणार असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्या ची शक्यता आहे. संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात महाआरती, भक्तिसंध्या तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.हा कार्यक्रम कुणबी समाज संघटना व कुणबी महिला संघटना, तेल्हारा शहर व तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा जागर करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.