
पारंपारिक वर्णाश्रमाच्या भिंती पुरत्या पाडून टाकत सर्वप्रथम मराठी संत साहित्य सार्थ करून, श्री मद्भगत गीते सहीत संस्कृत वांङ्मयाचे दरवाजे सर्वांकरिता सताड उघडे करून देत , भगवान श्री ज्ञानोबारायानंतर आपल्या मातृत्वाचा प्रेमपान्हा अठरापगड जातीच्या आबारवृद्धांना आकंठ पाजून , त्या सर्वांना आपण एका ईश्वराचे लेकरे असल्याने गुण्या गोविंदाने नांदण्याचे बाळकडू पाजून, वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांना अध्यात्मिक दृष्ट्या सुदृढ व सक्षम बनविणारे निरुपद्रवी समाज निर्मितीचे कारखानदार स्वानंद सुख निवासी सद्गुरु विष्णु महाराज जोग हे होत. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे थोडे तात्विक चिंतन.
आपली भारत माता पारतंत्र्याच्या शृंखलेमध्ये शेकडो वर्षापासून जखडली होती. अशा भीषण कालखंडात आध्यात्मिक शिक्षणाची तीव्र जिज्ञासा असलेल्या साधकांच्या सोयीच्या दृष्टीने २४.३.१९१७ चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १८३९ रोजी भगवान श्री ज्ञानोबारायांच्या जन्म , कर्म , लीला व समाधिरुपाने अखंड वास्तव्याने पुनित झालेल्या श्रीक्षेत्र आळंदी भूमीत माता इंद्रायणीच्या पवित्रतम् तटावर ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला कुठलेही शैक्षणिक शुल्क आकारल्या जाणार नाही व शिक्षकाला सुद्धा मानधन दिल्या जाणार नाही अशा प्रकारची घटना निर्माण करून, वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यावेळी त्यांचा हेतू हाच होता की, शिक्षण हा सर्व चळवळीचा पाया असून; धार्मिक शिक्षण हे त्या चळवळीचे रहस्य आहे. कुठल्याही देशाच्या उन्नतीसाठी फक्त अचाट बुद्धीच्या माणसांचा फारसा उपयोग होत नाही. तर त्या अचाट बुद्धीला शुद्ध आचरणाची व मनाच्या सुसंस्कृततेची नितांत आवश्यकता असते. मनाचा सुसंस्कृतपणा तसेच व उत्तम चारित्र्यची निर्मिती हे कार्य कायद्याच्या धाकापेक्षा धर्माच्या प्रेमानीच होते. ते घडण्याच्या दृष्टीने सोयीचे व्हावे याकरिता संस्थेची पायाभरणी करून, सर्वश्री श्रीगुरु बंकटस्वामी महाराज, मारुती महाराज गुरव, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर , प्रा. मामासाहेब दांडेकर या चार भरभक्कम स्तंभावर ही इमारत त्यांनी उभी केली . श्रीक्षेत्र आळंदी येथे शतकोत्तर कार्यरत असणाऱ्या या संस्थेने तेव्हापासून आजतागायत सामाजिक हिताचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे व प्रबोधनासह परिवर्तनाची क्षमता असलेले अनेकिनेक नामवंत प्रबोधनकार निर्माण केले. त्या अग्रण्यांपैकी एक विदर्भातल वारकरी संप्रदायाचे थोर प्रवर्तक संतश्री वासुदेव महाराज अडगावकर हे होत. ज्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन व संपत्ती आमजनतेला सुसंस्कृत बनविण्याकरिताच खर्ची घालून, आषाढ शुद्ध एकादशीच्या पर्वकाळावर २.७.२००९ भूवैकुंठ पंढरीक्षेत्रत स्वतःचा देह सुद्धा भगवान पंढरीषांच्या चरणी विलिन केला.
या थोर युगद्रष्ट्या महापुरुषानी आजन्म अहोरात्र आमजनतेकरीता अपार कष्ट करून स्थापन केलेली ही संस्था यावच्चंद्रदिवाकरौ चालावी याकरिता सर्व प्रकारची व्यवस्था लावून, माघ वैद्य प्रतिपदा शके १८४१ गुरुवार ५ .२.१९२० या शुभदिनी आपले उपाश्यदैवत असणाऱ्या भगवान श्रीज्ञानेशांच्या आळंदी क्षेत्रात सकाळी नऊ वाजता उत्तराभिमुख बसून ” का झांकलिये घटींचा दिवा l नेणिजे काय जहाला केव्हां l या रीती जो पांडवा l देह ठेवी ll ” या ज्ञानेशांच्यानाप्रमाणे आपल्या भौतिक शरीराचा त्याग करून माता इंद्रायणीच्या तीरावर अनंतात विलीन झाले. त्या स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित.
श्री ज्ञानेश्वर दासानुदास.
भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ. श्री संत वासुदेव जी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी ( भैरवगढ)