
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्हा मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार या आदिवासीबहुल गावात जिल्हा परिषद हायस्कूल व प्राथमिक मराठी शाळेने देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी संविधान तिरंगा रॅलीने परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष वेधले.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन वंदे मातरम, भारत माता की जय, भारतीय राज्यघटना जगात आहे महान, तिच्या रक्षणाचे सदा ठेवूया भान या गगनभेदी घोषणा देऊन राष्ट्रप्रथम चा संदेश दिला.
देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी मेळघाटातील गौलखेडा बाजार गावातील जिल्हा परिषद हायस्कूल व प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधान तिरंगा रॅली, देशभक्तीवर गगनभेदी घोषणा, देशभक्तीवर गीतावर कवायती, आदिवासी नृत्य व साक्षर होण्याची शपथ घेऊन परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे.इयत्ता १ते१०वी मधील विद्यार्थ्यांनी भारत मातेची आकर्षक वेशभूषा करून संविधान तिरंगा रॅलीचे नेतृत्व केले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणेचे फलक व हातात तिरंगा घेऊन संविधान व देशभक्तीपर गगनभेदी घोषणा दिल्यात. या संविधान तिरंगा रॅलीने पंचक्रोशीत देशभक्तीमय वातावरणाची निर्मिती केली. शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद काळमेघ यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी काढलेल्या या तिरंगा संविधान रॅलीत गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संविधान तिरंगा रॅली पश्चात ध्वजारोहण करून राष्ट्रगीतापूर्वी संविधान उद्देशिकेचे वाचन विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांवर लक्षवेधक कवायती परिसरात कौतुकाचा विषय ठरला असून विद्यार्थ्यांनी सादर केलेले देशभक्तीपर आदिवासी नृत्य प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे.शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद काळमेघ यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले लक्षवेधक सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाला अधिकच रंगत आणली. याप्रसंगी शाळा आमदार केवलराम काळे,माजी जिल्हा परिषद अमरावती समाजकल्याण सभापती दयाराम काळे, सरपंच रामेश्वर चिमोटे,व्यवस्थापन समिती अध्यक्ष दुर्गा मोरे, उपाध्यक्ष साहेबराव अंभोरे शाळेतील शिक्षक वृंद यांचेसह मोठ्या संख्येने युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामस्थांच्या चहा नाष्टा या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
नेहमीच आपल्या विविध उपक्रमांनी चर्चेत राहणारी गौलखेडा बाजार येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळा प्रजासत्ताक दिनाच्या विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमाने पुन्हा चर्चेचा व कौतुकाचा विषय ठरली आहे. सर्वत्र या उपक्रमांचे कौतुक होत आहे.