
बालवयातच कलेचे संस्कार गरजेचे – देवानंद गहिले
पातुर तालुका प्रतिनिधी
ग्रामीण भागातील मुला-मुलींमध्ये गायनकलेची आवड निर्माण व्हावी, त्यांना योग्य मार्गदर्शन व व्यासपीठ मिळावे या उद्देशाने पातुर येथे भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर बालकलाकार कराओके गायन वर्ग सुरू करण्यात आला आहे. या मोफत गायन वर्गाचे उद्घाटन 18 जानेवारी 2026 रोजी पातुर येथील महात्मा फुले मोफत दवाखाना येथील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले.
या कराओके गायन वर्गाचे उद्घाटन स्टार गायक कलावंत कराओके ग्रुपचे स्टार गायक व प्रसिद्ध कलाकार देवानंद गहिले यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना देवानंद गहिले म्हणाले की, “मोठा कलाकार घडवायचा असेल तर बालवयातच कलेचे संस्कार होणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण भागात प्रतिभा आहे, मात्र व्यासपीठ आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे अनेक कलाकार पुढे येऊ शकत नाहीत. शालेय शिक्षणासोबत संगीत, कला व साहित्याची जोड दिल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चित होतो.”
लता मंगेशकर यांच्या नावाने असलेल्या या सभागृहात उद्घाटन होत असल्याने देवानंद गहिले यांनी लता मंगेशकर यांनी गायलेले “ओ रामजी” हे गीत सादर करून कार्यक्रमाला वेगळीच कलात्मक रंगत आणली. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विठोबा गवई, स्टार गायिका प्रा. सौ. करुणा गवई, शेख मुख्तार भाई, विनोद भाऊ इंगळे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लता मंगेशकर यांची एकाहून एक गीते सादर करून बालकलाकारांना प्रेरणा दिली. शेख मुख्तार भाई यांनी तर लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रेरणादायी वातावरणामुळे अनेक बालकलाकारांनी पुढाकार घेत कराओकेवर गायनाची सुरुवात केली. यामध्ये कु. प्रिया अमोल बगाडे, कु. अक्षरा संदीप पोहरे, कु. प्राची निर्भय पोहरे, ईश्वरी श्रीकृष्ण बगाडे, ओम श्रीकृष्ण बगाडे, सिद्धार्थ दिनेश दामोदर, कृतिका श्रीकृष्ण बगाडे, पार्थ वासुदेवराव राखोडे, वेदिका वासुदेव राखोडे, समृद्धी दिनेश दामोदर यांच्यासह इतर बालकलाकारांनी विविध गीते सादर करत गायनाचा मनसोक्त आनंद घेतला. बालकलाकारांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून उपस्थित पालकांमध्येही समाधानाचे वातावरण होते.
सदर मोफत कराओके गायन कला केंद्राची संकल्पना संचालक डॉ. श्रीकृष्ण ढोणे व व्यवस्थापक श्री. वासुदेव राखुंडे यांची असून, पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी हे वर्ग दर रविवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मोफत घेण्यात येणार आहेत. वर्गासाठी नावनोंदणी आवश्यक असून विद्यार्थ्यांनी वही व किमान तीन गीते लिहून सराव करून येणे अपेक्षित आहे. पुढील टप्प्यात मुला-मुलींना माईकवर गायनाची संधी दिली जाणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचा वासुदेवराव राखोडे, वैशाली राखोडे, ज्ञानेश्वरी बगाडे यांनी स्वागत करून सत्कार केला तसेच देवानंद गहिले यांच्या हस्ते रिबीन कापून या मोफत कराओके गायन वर्गाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.