
पारंपारिक प्रचलित पौराणिक कथानकांनुसार आईसाहेब पार्वतीदेवींनी स्वसंरक्षणार्थ एका मातीच्या पुतळ्यामध्ये स्वतः प्राणप्रतिष्ठित करून त्याच्यावर स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी टाकली असता , त्याने प्रत्यक्ष भगवान शिवजींना सुद्धा अंत:पुरात जाण्यास प्रतिबंध केल्यामुळे त्यांच्यात घनघोर युद्ध होऊन , त्यांच्याकडून बालगणेशांचा शिरच्छेद झाला . शेवटी पार्वती मातेच्या क्रोधाला शांत करण्याकरिता भगवान शिवजींनी गजमुख बसवून त्याला पुनर्जीवित केले . या सर्व घटनांच्या मागे काय कारण आहे ? यांची तात्विक कारणमिमांसा होणे अत्यंत गरजेचे आहे .
शास्त्रीयदृष्टिकोनातून कुठलेही कार्य कारणाशिवाय कार्य घडू शकत नाही हे त्रिकालाबाधितसत्य आहे . परंतु सामान्यतः पौराणिक ग्रंथातील कथा असल्यामुळे त्यावर शंका घेतल्या जात नाहीत. किंवा त्यांना कपोलकल्पित म्हणून सोडून दिल्या जाते. वास्तविक पाहता शंका घेतल्या शिवाय कुठल्याही विषयाला बळकटी सुद्धा येत नसल्यामुळे , पुढील काही प्रश्न उपस्थित करून त्या शंकानिरसनाचा छोटासा प्रयत्न करूया.
प्रथमत: पार्वती देवीला रक्षणाची आवश्यकता का भासली ? पर्वतराज हिमालयाच्या सुकन्येला व प्रत्यक्ष भगवान शिवजींच्या अर्धांगिनीला शेवटी कोणापासून भीती वाटत होती ? त्यामुळे तिने स्वसंरक्षणार्थ गण निर्माण केला ? विशेष म्हणजे ज्या कल्पित व्यक्तीची नियुक्ती त्यांनी केली त्याला शिवजीने नष्ट का केले ? शेवटी त्याच्या आकंठ शरीरावर हत्तीचेच मस्तक का प्रत्यारोपित केले ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
मोठ्यांच्या कृतीमध्ये फार मोठा अर्थ व उद्देश असतात . त्यांच्या त्या कृतीचा लक्षपूर्वक विचार केला तर आपल्या लक्षात येईल की , पार्वती देवी ही स्वतः शक्ती स्वरूपा असल्यामुळे त्यांना आत्मरक्षणाची आवश्यकता नाही . सत्य तर हे आहे की , भगवान शिवच संसाराच्या रक्षणास सदैव तत्पर असुन , पार्वती ही त्यांची एकरूप अर्धांगिनी आहे . ते तर लोक कल्याणासाठी स्वार्थ व स्वहिताचा कधीच विचार करीत नाहीत . म्हणूनच समुद्रमंथन प्रसंगी प्राप्त झालेल्या चतुर्दश रत्नांपैकी पहिले कालकूट ( हलाहल ) नामक विष त्यांनी पार्वतीच्या संमतीने स्वतः प्राशन करून संपूर्ण जगताला अकाल प्रलयाच्या विपत्ती पासून मुक्त केले . राजा भगीरथाच्या विनंतीवरून स्वर्गातून पृथ्वीवर अति तिव्र आवेगान येत असणाऱ्या गंगामातेला त्यांनी स्वतःच्या डोक्यावर धारण करून तिच्या प्रवाहाला गतिरोध निर्माण करीत समग्र भारतवर्षाला सजलाम् सुफलाम् बनविले . ते स्वतःच मंत्र शास्त्राचे जनक असल्याने शब्दांचे त्यांनी प्रत्यक्ष दर्शन केले असून ; मंत्र शास्त्राच्या मर्यादे नुसार त्यांनी पार्वती देवीला ते ज्ञान दिले. त्या गुह्यतत्वज्ञानाचे रहस्य जाणणाऱ्या माता पार्वतीने मानवीय कुतूहलाने प्रेरित होऊन , एका व्यक्तीची कल्पना केली . तो स्थुलदृष्टीने केवळ मानवरूप परंतु तांत्रिकदृष्ट्या मात्र तो पूर्णतः शब्दस्वरूप आहे . किंबहुना तो प्रत्यक्षात रक्षण करण्याचे प्रतीक असून ,त्यांनी आपल्या शक्तीने त्या मातीच्या पुतळ्यामध्ये मंत्राद्वारे प्राणप्रतिष्ठित केला . महत्त्वाचे म्हणजे साधनेच्या सर्वच मंत्रांमध्ये मंत्रद्रष्ट्या ऋषींनी आपल्या तपश्चर्येद्वारा प्राणप्रतिष्ठित केला आहे . त्यामुळे मंत्र तंत्र हे थोतांड नसून, ते फार मोठे अध्यात्मशास्त्रीय विज्ञान आहे. विश्वामित्रादिक राजश्रींनी मंत्र सामर्थ्यांनीच प्रति सृष्टीचे निर्माते होऊन, ब्रह्मर्षित्व प्राप्त करून घेतल्याचा पौराणिक इतिहास आहे.
भगवान शिवजी जेव्हा पार्वती देवी द्वारा स्थापित मंत्राची परीक्षा घेतात . तेव्हा त्यांच्यासमोर तो मंत्र असफल व असमर्थ ठरतो . भगवान शिवांचा एक स्वभाव विशेषआहे त्यांना दोष आणि जरा कधीच सहन होत नसल्याने ते त्याला नष्ट करतात . तसेच जेव्हा जेव्हा संसार जीर्ण होतो तेव्हा तेव्हा ते प्रलयंकर होऊन, त्याचा संहार करीत असतांना सुद्धा त्यामध्ये ते नृत्य करतात . कारण ते नृत्य नष्ट करण्याकरिता नाही तर , नवसृजना करीता करीत असतात . त्यांच्या संहारात सुद्धा सृजन दडलेले असल्यामुळेच त्या संहारात नृत्य करणाऱ्या उदात्त नटराज महारुद्राला सदाशिव असे म्हटले जाते.
पार्वतीजी द्वारा स्थापित मंत्राची असमर्थता , अपुर्णता त्यांना न रुचल्यामुळे त्यांनी त्यांला निष्प्राण केले व त्याच्या संहारा बरोबर सुजन जुळले असल्यामुळे त्यांनी त्याचे पुनर्निर्माणही केले . त्यात आकंठधड पार्वती निर्मित व शिर मात्र शिव निर्दिष्ट आहे . हत्तीच्या गंडस्थळा पासून थोड्या वाकड्यासोंडीचा जो आकार बनतो तो इतर कोणत्याही प्राण्यात बनू शकत नाही . त्याच्या त्या आकारापासून प्रणव मंत्राची प्रत्यक्ष आकृती निर्माण होत. जो स्वभावता आत्मरक्षीत असून ,त्याच्यामध्ये तीव्र प्रतिरोधकशक्ती असल्यामुळेच सर्वविघ्न दूर होतात . अकार चरणयुगुल l उकार उदर विशाल l मकार महामंडल l मस्तकाकारें ll हे तिन्ही एकवटले l तेथें शब्दब्रह्म कवळलें l तें मियां गुरुकृपा नमिलें l आदिबीज ll म्हणून गजमुखधारी श्रीगणेश हे आत्मरक्षक प्रणवाचे मूर्तीमंत स्वरूप आहेत. उपरोक्त सर्व कथा हि त्या उभयतांनी आत्मरक्षणार्थ नाही तर ; संपूर्ण विश्वरक्षणार्थ केलेली एक लीलाच असून, ही लीला ज्या तिथीला घडली त्या ” श्रीगणेश जयंतीच्या ” व माघी गणेशोत्सवाच्या संपूर्ण गणेश भक्तांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
श्री ज्ञानेश्वरदासानुदास.
भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ.
श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ
श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.