
दानापुर प्रतिनिधी :नंदकिशोर नागपुरे
वान नदी ही परिसरातील शेतकरी, नागरिक व ग्रामस्थांसाठी केवळ जलस्रोत नसून संपूर्ण भागाची जीवनवाहिनी आहे. उंच प्रदेशातून सरळ प्रवाहाने वाहणारी ही नदी नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पात्रातून खळखळत वाहते. तिचे पात्र रुंद असून पाण्याचा प्रवाह स्वच्छ व नैसर्गिक आहे.
नदीपात्रात आढळणारी रेती, वाळू, गोटे तसेच लहान-मोठ्या दगडांची रचना पूर्णतः नैसर्गिक असून त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरते. यामुळे भूजल पुनर्भरण होते आणि आजूबाजूच्या गावांचा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. या भागात मातीचा गाळ अत्यल्प प्रमाणात असल्याचे नागरिकांचे मत आहे.
मात्र अलीकडच्या काळात वान नदीच्या वारंवार खोलिकरणाच्या प्रस्तावांमुळे नदीच्या नैसर्गिक रचनेत बिघाड होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. खोलिकरण केल्यास नदीतील रेती व गोटे काढून घेतले जातील, ज्यामुळे पाणी जमिनीत न मुरता थेट वाहून जाईल. परिणामी भविष्यात नदीपात्रात मातीचा गाळ साचेल, जो घट्ट बसल्यामुळे पाण्याचे झिरपणे मोठ्या प्रमाणात कमी होईल. हा नदीकाठच्या गावांसाठी मोठा भविष्यातील धोका ठरू शकतो.
सध्या वान नदीचे पात्र इतके रुंद आहे की नदीकाठच्या गावांना पुराचा कोणताही धोका निर्माण होत नाही. त्यामुळे नियमापेक्षा अधिक खोलिकरण केल्यास फायदा न होता नुकसानच जास्त होईल, असे मत ग्रामस्थ व शेतकरी व्यक्त करत आहेत.
यामुळे नदीची नैसर्गिक रचना कायम ठेवत खोलिकरणाऐवजी केवळ नदी नांगरणी (देखभाल स्वरूपाची कामे) करावी, अशी ठाम मागणी जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे. निसर्गाच्या रचनेत फेरबदल केल्यास भूजल पुनर्भरणावर विपरीत परिणाम होईल, म्हणून पर्यावरणपूरक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया
१)“आज पावसाळ्यात नदीमध्ये वाहणारे पाणी रेती व गोट्यांमुळे मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरते. त्यामुळे आजूबाजूच्या गावांचा पाण्याचा प्रश्न राहत नाही. परंतु खोलिकरण झाल्यास व्यावसायिक फायद्यासाठी रेती व गोटे काढले जातील आणि भविष्यात मातीचा गाळ साचून मोठे नुकसान होईल.”
श्रीकृष्ण रमेश झाडोकार (दानापुर)
2)जैवविविधतेच्या साखळीत नद्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेल्हारा तालुक्यासाठी वान ही जीवनदायिनी नदी असून उत्खननास परवानगी देताना पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. वान नदीची वैशिष्ट्यपूर्ण ओळख कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे.”
तर उत्तमराव नळकांडे (वान फाऊंडेशन, तेल्हारा)