
राजकुमार चिंचोळकर:- बाळापुर तालुका प्रतिनिधी
सध्याच्या परिस्थितीत बाळापूर तालुक्यात रब्बी हंगामातील उन्हाळा कांदा लागवडीची लगबग सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत बाळापूर तालुक्यात बागाईत क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे रब्बी हंगामात गहू. हरभरा. उन्हाळी ज्वारी सह कांदा लागवडीचे क्षेत्र सुध्दा अधिक प्रमाणात राहते. सध्याच्या परिस्थितीत तूर पिकाचा कालावधी काही भागात जवळपास पूर्णत्वास असल्याने तूर पिकाची कापणी करून शेतात कांदा लागवडीसाठी आवश्यकतेनुसार मशागतीची कामे पूर्ण होताना दिसत आहे. कांदा लागवडीचा काही भागात प्रारंभ तर काही भागात कांदा लागवडीची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे रब्बी हंगामातील इतर पिकांच्या तुलनेत कांदा पिक महत्वपूर्ण समजले जाते. अडीच ते साडेतीन महिने कालावधीचे कांदा पीक असून कांदा लागवडीपासून कांदा काढणी पर्यन्त आंतरमशागत सह इतर अंदाजे जवळपास एक एकर क्षेत्रफळाला साठ ते सत्तर हजार रुपये खर्च अपेक्षित राहतो . दरम्यान निसर्गाची अवकृपा झाल्यास त्याचा कांदा पिकाला फटका बसून उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात राहते. तरी सुद्धा परिसरात कांदा उत्पादक शेतकरी कांदा पिकाचे भरघोस उत्पादन होवून बाजार पेठेत कांदा पिकाला समाधान कारक भाव मिळेल असे हिरवं स्वप्न उराशी बाळगून कांदा लागवडीची कामे जोमाने सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.