
अकोला प्रतिनिधी :-
अकोला येथील शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात पार पडलेल्या वनराई बालकुमार साहित्य संमेलनात “पर्यावरण रक्षण करा, नाहीतर विनाश अटळ” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या बालकुमारांच्या परिसंवादाने उपस्थित रसिक, पालक व साहित्यप्रेमींना विचारप्रवण केले. या परिसंवादातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश बालवक्त्यांच्या प्रभावी आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणीतून ठळकपणे समोर आला.
या परिसंवादात स्मित सचिन भोयर (स्कूल ऑफ स्कॉलर, अकोला), मृणाली सागर उकर्डे (गुरुकुंज इंग्लिश कॉन्व्हेंट, बोथा काजी, ता. खामगाव) आणि अर्चना ओईम्बे (महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गांधीग्राम),आरुषी भुजाडे (पि. एम. श्री. जि. प. विद्यालय कामरगाव )या बालवक्त्यांनी सहभाग नोंदवला. वाढती वृक्षतोड, प्रदूषण, पाणीटंचाई, हवामान बदल यांसारख्या गंभीर पर्यावरणीय संकटांवर त्यांनी परखड व अभ्यासपूर्ण विचार मांडले. निसर्गाशी समतोल राखण्याची जबाबदारी मानवाने स्वीकारली नाही, तर भविष्यात विनाश अटळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्षा डॉ. प्रतिमा इंगोले उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विनय दांदळे, अभंगकार प्रवीण हटकर, कवी संतोष भाकरे आणि कथालेखिका अर्चना मोरे यांची मंचावर उपस्थिती होती. मान्यवरांनी बालकुमारांच्या स्पष्ट भूमिकेचे कौतुक करत पर्यावरण रक्षण ही आजच्या काळातील सर्वांत मोठी सामाजिक गरज असल्याचे प्रतिपादन केले.
बालपिढीचे प्रतिनिधी म्हणून बालवक्त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी संघटित होण्याचा, झाडे लावण्याचा, जलस्रोत जपण्याचा आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. हीच पिढी भविष्यात निसर्गाचे रक्षण करणारी जबाबदार पिढी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या परिसंवादाचे संचालन तुळशिदास खिरोडकार यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत आयोजन समितीच्या वतीने बबन कानकिरड आणि ज्ञानेश्वर मांडेकर यांनी केले. या साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने बालकुमार रसिकांसह प्रौढ पालकांची उपस्थिती होती.
बालमनातून व्यक्त झालेली पर्यावरणाविषयीची जाणीव आणि कृतीचा संदेश वनराई साहित्य संमेलनातील हा परिसंवाद विशेष ठरला.
बालकुमारांचा निर्धार ( बॉक्स)
आम्ही बालपिढी आहोत; पण निसर्गाचे रक्षण करण्याची जबाबदारी आम्ही पूर्ण जाणीवपूर्वक स्वीकारतो. झाडे लावणे, पाणी वाचवणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, स्वच्छता राखणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे, हा आमचा ठाम संकल्प आहे. आज निसर्ग वाचवला तरच आमचे उद्याचे भविष्य सुरक्षित राहील.”