
तेल्हारा प्रतिनिधी :-
भिमराव परघरमोल. राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा त्याग, समर्पण, कष्ट व व्यवस्थेसोबत दोन हात केल्यामुळे महिलांना आज सुखाचे दिवस आले आहेत, असे प्रतिपादन भिमराव परघरमोल (व्याख्याता तथा अभ्यासक फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा तेल्हारा जि. अकोला) यांनी केले.
सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा संयुक्त जयंती समारोह जि. प. मराठी प्राथमिक शाळा सोनाजी नगर, सोनाळा येथे साजरा करण्यात आला. तेव्हा अध्यक्षस्थानी सुमेध दामोदर (पत्रकार तथा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती) व उद्घाटक संदीप काळे (ठाणेदार पोलीस स्टेशन सोनाळा) हे असून प्रमुख अतिथी म्हणून भिमराव वानखडे (केंद्रप्रमुख) दिनकर चांदुरकर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) मनीष वानखडे (अध्यक्ष कन्या शाळा) पद्माताई वावरे (ग्रा. पं. सदस्य) निलेश लहासे (पत्रकार) शेख असलम (उर्दू शिक्षक) सिद्धार्थ बोदडे, पुनमताई वानखडे, गजानन बावणे यांची उपस्थिती होती.
प्रतिमापूजन तसेच पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तेव्हा भिमराव परघरमोल पुढे म्हणाले की, महिलांना अतिशय प्रतिकूल दिवस असताना विषमतावादी व्यवस्थेशी दोन हात करून राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी संघर्ष केला. परंतु आजच्या महिला त्यांच्याप्रती किती कृतज्ञता बाळगतात हा चिंतेचा, गंभीर आणि चर्चेचा विषय आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर भामद्रे, कार्यक्रमाचे संचालन गणेश जामनेकर (मुख्याध्यापक) यांनी केले तर आभार भगवान बावणे (शिक्षक) यांनी मानले. कार्यक्रमाला जि. प. उर्दू शाळेसह गावातील माता पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षासह सदस्यांनी प्रयत्न केले.