
तेल्हारा प्रतिनिधी :-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांच्या वतीने ५३ वे राज्यस्तरीय अधिवेशन रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मैदान, टिळकनगर, चेंबूर, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्याय्य मागण्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडून त्या मान्य करून घेण्यासाठी सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे,अमरावती विभाग कार्यवाह डॉ. विजयराजे ताले यांनी केले आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने आणि ठामपणे लढा देणारे नेतृत्व म्हणून डॉ. विजय ताले संपूर्ण अमरावती विभागात परिचीत आहेत. तालुका व जिल्हा स्तरावर बैठका, दौरे व थेट संवादाच्या माध्यमातून त्यांनी कर्मचाऱ्यांना संघटित केले असून त्यांच्या नेतृत्वामुळे संघटना अधिक बळकट होत आहे.
या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारी २०२६ रोजी तेल्हारा तालुक्यातील श्रीनाथ विद्यालय, मनब्दा येथे तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत अकोला जिल्ह्यासह अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांतील जास्तीत जास्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अधिवेशनात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. वेतनवाढ, प्रलंबित प्रश्न व १०,२०,३०, आश्वासीत प्रगती योजना,पुर्वलक्षीप्रमाणे,अर्जीत रजा रोखीकरणाला मर्यादा हटविने,विविध न्याय्य मागण्यांसाठी संघटित संघर्ष आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
मुंबई येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय अधिवेशनास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार निरंजन डावखरे व आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. राज्य अध्यक्ष अनिल माने व सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या अधिवेशनासाठी अकोला जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.