
तेल्हारा प्रतिनिधी :-विलास बेलाडकर
तेल्हारा खाद्यतेलांच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करून देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढावे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राबविले जाणारे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान प्रत्यक्षात मात्र तेल्हारा तालुक्यात केवळ कागदोपत्रीच अस्तित्वात असल्याचे वास्तव समोर येत आहे. उन्हाळी भुईमूग पेरणीचा अत्यंत महत्त्वाचा कालावधी सुरू असताना, या योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेले बियाणे अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. परिणामी हजारो शेतकरी अक्षरशः वाऱ्यावर सोडले गेले असून, कृषी विभागाच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या अभियानांतर्गत उन्हाळी भुईमूग व तीळ पिकांच्या प्रमाणित बियाणांचे १०० टक्के अनुदानावर वितरण जाहीर करण्यात आले आहे. भुईमूग पिकासाठी हेक्टरी १५० किलो शेंगा (११४ रुपये प्रति किलो) तर तिळासाठी हेक्टरी २.५ किलो (१९७ रुपये प्रति किलो) बियाणे मोफत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. प्रति लाभार्थी किमान ०.२० हेक्टर ते कमाल १ हेक्टर अशी लाभमर्यादा ठरविण्यात आली आहे.
तेल्हारा तालुक्यातील दानापुर, वारखेड, वारी, पिपरखेड, सौदळा, कार्ला, हिवरखेड, झरी, चिचारी, चंदनपूर, खंडाळा, चितलवाडी, अकोली, काळेगाव आदी गावांतील हजारो शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करून ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर वेळेत पैसे खर्च करत ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. मात्र योजना जाहीर होऊन बराच कालावधी उलटून गेला तरीही प्रत्यक्ष बियाणे वितरणाला अद्याप सुरुवात न झाल्याने शेतकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे.
दरम्यान, उन्हाळी हंगामातील भुईमूग पेरणीचा कालावधी अत्यंत निर्णायक असतो. अनेक शेतकऱ्यांनी आधीच आंतरमशागत करून जमीन पेरणीसाठी सज्ज ठेवली आहे. मात्र बियाण्यांअभावी शेतीची सर्व कामे ठप्प झाली असून, वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनात मोठी घट होऊन आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
“योजना कागदावर अतिशय आकर्षक दिसते; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत प्रचंड विलंब आणि अनास्था दिसून येत आहे. बियाणे वेळेत मिळाले नाही तर संपूर्ण उन्हाळी हंगाम वाया जाणार आहे. या संभाव्य नुकसानीला जबाबदार कोण?” असा थेट आणि जळजळीत सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाचा खरा उद्देश साध्य करायचा असेल, तर तालुकानिहाय बियाणे वितरणाला तातडीने गती देणे अत्यावश्यक आहे. संबंधित कृषी विभागाने त्वरित दखल घेऊन तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांना भुईमूग बियाणे उपलब्ध करून द्यावे;
विनोद मिरगे शेतकरी सौंदळा