
धिरज संतोष बजाज हिवरखेड प्रतिनिधी:-
हिवरखेड नगरपरिषद च्या पहिल्याच निवडणुकीनंतर “मोठी उलाढाल” झाली असून परंपरागत पिढीजात काँग्रेसचे नेते म्हणून ओळखल्या जाणारे श्यामशील सहदेवराव भोपळे यांनी विरोधी पक्षात असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कडून स्वीकृत नगरसेवक पद मिळविण्यात यश मिळविले असून त्यासाठी मात्र त्यांना संजय राठोड आणि गोपीकिशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करावा लागला. सदर स्वीकृत नगरसेवक पदासाठी ही “मोठी उलाढाल” असल्याची चर्चा होत आहे. त्यासोबतच सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले असून गुवाहाटी घटनेच्या धरतीवर “अमुख खोके एकदम ओके” असे विविध मिम्स सोशल मीडियावर फीरत आहेत.
याप्रकरणी आम्ही श्याम भोपळे यांची आणि शिवसेना गट नेते रवी घुंगड यांची
प्रतिक्रिया जाणून घेतली.
प्रतिक्रिया
गावाच्या विकासासाठी सत्तेत आणि पदावर असणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी (शिंदे गट) शिवसेनेत प्रवेश घेतला असून स्वीकृत नगरसेवक पदी माझी निवड झाली आहे.
श्यामशील भोपळे, माजी तालुकाध्यक्ष काँग्रेस
श्यामशील भोपळे हे अनुभवी नेते आहेत सोबतच स्वीकृत नगरसेवकाच्या सर्व पात्रता ते पूर्ण करतात. त्यांच्या अनुभवाचा विरोधी पक्षाला फायदा होईल. म्हणून त्यांनी शिवसेनेत विधिवत प्रवेश केल्यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आले…
रवी घुंगड, गटनेता, शिवसेना शिंदे गट