
सचिन महाजन हिंगणघाट प्रतिनिधी
हिंगणघाट : तालुक्यातील शेकापूर (बाई) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची (SMC) निवड आज उत्साहात व सर्वानुमते पार पडली. शासनाच्या शाळा व्यवस्थापन समिती संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे व नियमांनुसार पालकांमधून व स्थानिक घटकांच्या सहभागातून ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. या निवडीत विकास तिजारे यांची अध्यक्षपदी, तर सोनाली बारापात्रे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. समितीमध्ये पालक प्रतिनिधी म्हणून विविध घटकांचा समतोल राखत सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
समितीचे सदस्य म्हणून कविता खोले, गणेश धुर्वे, स्वाती सोनटक्के, भाग्यश्री बुधे, प्रदीप मांढरे, जयश्री इंगोले, ज्योती फुलभोगे, प्रतिक चौधरी, किशोर येरेकार, सुचिता सहारे, मनीषा गोरख व चंदू क्षीरसागर यांची पालकांमधून निवड करण्यात आली. तसेच शिक्षणतज्ञ म्हणून संदिप मेघरे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. शिक्षणाविषयी असलेली विशेष आवड, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सकारात्मक दृष्टीकोन लक्षात घेऊन उपस्थित पालकांनी त्यांचे नाव एकमताने सुचविले.
या निवड प्रक्रियेत सचिव म्हणून मुख्याध्यापक परमेश्वर नरवटे यांनी काम पाहिले. सदर सभा मावळते अध्यक्ष स्नेहा थुल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
नवीन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी तसेच पालक-शिक्षक-समाज यांचा समन्वय अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून या निवडीबद्दल सर्व स्तरातून नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.