
वारकरी संप्रदायाच्या संत कृपा रुपी इमारतीच्या पायामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी यांच्या बलिदाना नंतर आळंदी स्थित सिद्ध बेटातील गवताच्या कुटीत निवृत्तीनाथ , ज्ञानोबाराय, आणि सोपान काका या तीन ज्येष्ठ भावंडांसोबत राहत असतांना त्यांनी भिक्षा मागून आणलेल्या कोरांन्नाचे मिष्ठांन्न बनवून देत या तिघांची लाडकी लडिवाळ मुक्ता हे मुक्ताबाई व लवकरच या तिन्ही मुक्तांची आई मुक्ताई कधी झाली हे कळले सुद्धा नाही. अर्थातच नात्याने बहीण असलेली आदिशक्ती मुक्ताई हे तीन मुक्तांची आई झाल्याचे गौरवोद्गार भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी काढले.
ते आज स्थानिक जिल्हा परिषद नगर खडकी परिसरातील हनुमान मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे उपासक असणारे श्रीयुत भानुदास महाराज सखारामपुरकर यांच्या मुखारविंदातून संपन्न होत असणाऱ्या भावकथा निरूपण सप्ताहातील कीर्तनप्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की , ब्रह्मा ,विष्णू , महेश हे त्रिदेव जेव्हा निवृत्ती , ज्ञानदेव ,सोपान या संतत्रयांच्या रूपाने या अवनीतलावर अवतीर्ण होण्याकरिता उद्युक्त झाले असतांना आदिशक्ती योगमायेनी सुद्धा त्यांच्यासोबत अवतरित होण्याचा आग्रह धरला . तेव्हा त्या त्रिदेवांनी तिला सांगितले की, तुला जर आम्ही सोबत घेतले तर , हे योगमाये ! तु तुझ्या स्वभावात प्रमाणे मायेचा पडदा टाकून आमच्या जगदोद्धाराच्या कार्यास आच्छादित करून टाकशील. तेव्हा तिने सांगितले की , मी तुमच्या कार्यास कुठल्याही पद्धतीचा प्रतिबंध निर्माण न करता तुम्हा तिघांसोबत येऊन, लाडक्या बहीणीच्या रूपाने तुमची पाठ राखण करेल , मानसकन्या होऊन तुमच्या ठिकाणी जगदोद्धाराची प्रेरणा निर्माण करेल तसेच प्रसंगी तुम्हा तिघांची आई होऊन अधिकार वाणीने उपदेशही करेल. म्हणूनच संत रूपाने अवतरीत झालेल्या योगमाया मुक्ताईने एकटीनेच उपरोक्त तिन्ही भूमिका अगदी योग्य पद्धतीने कशावर वठवील्या याचे सप्रमाण ,सखोल व चिंतनात्मक विश्लेषण महाराजांनी ताटी उघडा ज्ञानेश्वरा या अभंगाच्या माध्यमातून करून उपस्थितांना मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला अगदी नवीन विषयाची पर्वणी प्राप्त करून देत मंत्रमुग्ध केले असे अविभाऊ गावंडे हे कळवितात.