
तेल्हारा प्रतिनिधी :-
बीज कितीही उच्च प्रतीचे असले तरी , ते आकाशात कधीच उगवत किंवा फोफावत नसते. त्याला अंकुरित होऊन त्याचे विशाल वृक्षात रूपांतरण होण्याकरिता माती महत्त्वाची असते. तद्वत मानवी जीवनाच्या उत्कर्षा करिता माता महत्त्वाची असते. किंबहुना पुत्र हे चारित्र्यसंपन्न मातेचे जगतासमोर प्रगट झालेले प्रत्यक्ष चलचित्रच असते.म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये जन्मभूमी ( भूमाता ) आणि जननी ( स्वमाता ) या दोघींचे स्थान स्वर्गापेक्षाही महत्त्वाचे आहे. भारतीय पौराणिक तथा अर्वाचीन काळातील इतिहासामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र नंतर त्याच तोलामोलाचा चारित्र्यसंपन्न सुपुत्र शिवबांना नुसती जन्माला घालणारी नव्हे तर , प्रत्यक्ष स्वराज्याचा प्रथम छत्रपती घडविणारी माता विदर्भ राजकन्या अर्थातच श्रीमंत श्री लखुजीराव जाधव यांची वीरकन्या , शहाजीराजे भोसले यांची रणरागिनी वीरांगणा वीरपत्नी , तसेच श्रीमंत अहिल्यादेवी होळकरांप्रमाणे दातृत्व , राणी लक्ष्मीबाई समान शुरत्व , माता मदालसे सारखी ज्ञातृत्व व उपरोक्त सर्व गुणांसह मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र चौदा वर्ष पर्यंत वनवासात असतांना अयोध्ये सारख्या सार्वभौम सिंहासनावर निर्जीव पादुकांची स्थापना करून संन्यासवत जीवन जगून, राजकोष चौपटीने वाढविणाऱ्या कर्मयोगी भरता नंतर राजे औरंगजेबाच्या नजर कैदेत असतांना त्यातून सुटून राजगडावर परत येईपर्यंत राज्यात कुठल्याही प्रकारच्या बंडाळीच्या माध्यमातून अराजकता निर्माण न होऊ देता राज्याची धुरा समर्थपणे सांभाळणारी कर्तृत्व व नेतृत्व संपन्न , छत्रपतींची वीरमाता तसेच समग्र मराठ्यांची राजमाता आऊसाहेब जिजाऊ होत.
महाराष्ट्र ही संतांबरोबरच शूरवीरांची भूमी असून , आजही या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या अनेक बालकांमध्ये उपजतच शिवबांचे गुण या मातीतूनच आलेले दिसून येतात. फक्त उणीव आहे ती आऊसाहेबांसारख्या मातेची म्हणून ” राजे तुम्ही पुन्हा जन्माला या ” हे म्हणण्याऐवजी “आऊसाहेब तुम्ही पुन्हा जन्माला या ” हेच म्हणणे संयुक्तिक होईल. तरच या स्वराज्याचे सुराज्यामध्ये रूपांतरण होऊन, हा देश पुन्हा एकदा जागतिक महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. त्या १२.१. १५९८ रोजी या अवनीतलावर अवतरीत झालेल्या आऊसाहेब जिजाऊंच्या जन्मदिन त्यांना मानाचा मुजरा.
आपल्या ओजस्वी वाणी बरोबरच तेजस्वी चेहऱ्याने १८९३ साली शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेमध्ये अमेरिकेतील ” माझ्या बंधू आणि भगिनींनो “या विश्वबंधुत्वाच्या प्रथम उद्घोषाने सर्वांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेत सर्वोत्कृष्ट, सर्वसमावेशक ,सर्वहितकारी, सर्वांनुकरणीय , निश्चितफलदायिनी स्वरूप असणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन जगताला करविणाऱ्या १२.१.१८६३ रोजी या पृथ्वीतलावर धर्मरक्षणार्थ अवतरीत झालेल्या भगव्या वस्त्रातील युवा संन्याशी ज्ञानयोगी स्वामी विवेकानंदांच्या चरणी कोटी कोटी नमन.
आपल्या उपजतच पिढीजात निस्पृहता, निष्कामता व निष्कलंकता या त्रिविधगुणांनी ज्यांनी उत्कृष्ट व्यवस्थापनातून सुंदरता , स्वच्छता आणि शांतता या त्रिसूत्रीवर भर देऊन, योगी सम्राट गजानन महाराज संस्थानचे नावलौकिक वैश्विकस्तरावर येऊन पोहोचविले , ज्यांनी उभ्या आयुष्यात समाजा व शासनाकडून सन्माना दाखल हारतुरे, शाल श्रीफळ, सत्कार व पुरस्कार कधी स्वीकारला नाही. तसेच संस्थेकडून सुद्धा अन्न, मान , धन तर, दूरच दूर साधे जल सुद्धा स्वीकारले नाही. शेकडो वर्षाच्या पारतंत्र्याच्या शृंखडा तोडून आपला देश स्वधर्मरूपी सूर्यादयाची स्वातंत्र्याच्या क्षितिजावर उभे राहून वाट पाहत असतानांच १२.१.१९४० रोजी योगी सम्राट गजानन महाराजांच्या कृपांकित गणेश परिवारामध्ये अवतरीत झालेल्या श्वेतवस्त्रातील अलौकिक संन्याशी निष्काम कर्मयोगी भाऊसाहेब शिवशंकरजी पाटील या जन्मदिनी त्यांचे चरणी कोटी कोटी नमन. राजमाता जिजाऊंच्या निमित्ताने राष्ट्रभक्ती , स्वामी विवेकानंदांच्या रूपाने ज्ञान व श्रीयुत भाऊ साहेबांच्या रूपाने मूर्तिमंत वैराग्य अर्थातच राजमातेसह ज्ञान व कर्मयोग्याच्या जयंत्युत्सवाच्या त्रिवेणी संगमावर त्यांच्या पुनरावतारा करिता भगवद् चरणी विनम्र प्रार्थना.
श्री ज्ञानेश्वरदासानुदास.
भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ. श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर. श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.