
तेल्हारा प्रतिनिधी :-
श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.
अखिल मानव मात्रांचा पहिला गुरु ही आई असून, मंत्र तंत्रांचा उपदेश करणारे गुरु घरोघरीच प्राप्त होतात. परंतु शिष्याला सत् म्हणजे परमात्मा स्वरूपास जो प्राप्त करून देतो त्याला सद्गुरु असे म्हणतात. संत हेच खऱ्या अर्थाने जगताचे गुरु असून, प्रत्येकांचेच गुरु संत असतात असे मात्र नाही. किंबहुना केवळ तत्त्वोपदेश करतात ते गुरु व तत्वोपदेशासह हितोपदेश करतात त्यांना श्रीगुरु असे म्हणत असून , प्रामुख्याने गुरुरूपाने प्राप्त झालेल्या संतांनाच श्रीगुरु असे म्हणतात हे अभ्यासपूर्णमत भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज चितलवाडी नामक ग्राम मध्ये परमहंस संत श्री रंगनाथ महाराज यात्रा तसेच माता लक्ष्मी देवी पुण्यतिथी निमित्ताने आयोजित सप्ताहातील कीर्तनप्रसंगी बोलत होते. ती पुढे म्हणाले की, मनुष्य चांगले कार्य करायला लागल्यानंतर त्याला मित्रा पेक्षा शत्रूच अधिक प्रमाणामध्ये प्राप्त होत असतात. त्यातही तो परमार्थिक क्षेत्रात कार्यरत असेल तर, ही संख्या कित्येक पटीने वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत जीवन जगत असताना नवोदित साधकांची बरीच हेळसांड होत. त्यामुळे तो पुरता गोंधळून जाऊन प्रसंगी मार्ग सोडून जाण्याचा सुद्धा विचार करीत असतो. अशावेळी श्रीगुरुसारखा भरभक्कम पाठीराखा प्राप्त झाल्यास तो साधक इतरांची मोजदाद करीत नाही. भक्तराज अर्जुनाने गीतेच्या द्वितीयोध्यायामध्ये शिष्यत्व पत्करल्यानंतर भगवान श्रीकृष्ण हे महाभारत युद्धामध्ये त्याच्या सोबत श्रीगुरु म्हणून उभे राहिलल्यामुळेच भीष्म द्रोणांसारखे दोन तट व जयद्रथ रुपी भयंकर पाण्याचा ओघ, शकुनी मामा रुपी काळा खडक, मद्रराज शल्य जिच्यातील मगर, कृपाचार्य ज्यातील नौका तसेच कर्णा सारख्या भरतीची लाट, अश्वत्थामा व विकर्ण ज्या नदीतील घोर सुसरी आणि दुर्योधन हा जिच्यातील भवरा आहे , अशा भयंकर रणनदीतून भगवान श्रीकृष्णांसारखा श्रीगुरु रुपी नावाडी प्राप्त झाल्यामुळे पांडव सहज करून गेले. अशा अनेक उदाहरणांनी महाराजांनी विषय श्रोत्यांना आपल्या सहज प्रासंगिक विनोदपूर्ण भाषेतून पटवून दिला तसेच आबालवृद्धांची भरगच्च उपस्थिती व शिस्त सांभाळल्याबद्दल आयोजक तथा गावकऱ्यांचे तोंड भरून कौतुक केल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.