
. सचिन महाजन :-हिंगणघाट प्रतिनिधी हिंगणघाट तालुक्यातील खापरी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माता-पालक उपस्थित होत्या. कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता तो प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा ठरला.
कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक महिलेने आपल्या आयुष्यातील त्या व्यक्तीची आठवण काढली, ज्यांनी तिच्या स्वप्नांना बळ दिलं, अडचणींमध्ये खंबीर साथ दिली आणि पुढे जाण्याचा आत्मविश्वास दिला. कोणासाठी तो वडील होते, कोणासाठी भाऊ, कुणासाठी मुलगा तर कुणासाठी पती पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक खरा-खुरा ‘ज्योतिबा’ नक्कीच होता. आपल्या प्रगतीमागील त्या माणसाबद्दल बोलताना अनेक मातांचे डोळे पाणावले. शब्द कमी पडत होते, भावना ओघळत होत्या. काही मातापालक इतक्या भावूक झाल्या की आपले मन मोकळे करताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्या क्षणी संपूर्ण मैदानात संवेदनशीलतेचे, कृतज्ञतेचे आणि माणुसकीचे वातावरण निर्माण झाले. हा कार्यक्रम केवळ सावित्रीबाई फुलेंच्या कार्याची आठवण करून देणारा नव्हता, तर आजच्या समाजातील प्रत्येक ‘ज्योतिबा’ला दिलेला मनापासूनचा मानवंदनाच होता.
शाळेतील मुलींनी यावेळी सावित्रीबाई यांचा तर मुलांनी ज्योतिबा यांचा वेश परिधान केला होता.यावेळी शाळेचे मुख्यद्यापक श्री मोरारजी राठोड सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले तर शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा सौ. अस्मिता आशिष नगराळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले की ज्या प्रमाणे त्या काळी ज्योतिबा खंबीरपणे सावित्रीबाई यांच्या पाठीमागे उभे होते त्याचप्रमाणे आजच्या काळात देखील प्रत्येक पुरुषांनी महिलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी व स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली