धिरज संतोष बजाज:- हिवरखेड प्रतिनिधी :-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चे पैसे बरेच दिवसांपासून खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक लाडकी बहिणी एकमेकिंना फोन द्वारे कावो तुये पैसे आले काय??? अशी आपसात विचारणा करताना दिसत आहेत.
नगरपालिका निवडणुका झाल्यावर शहरातील एका वेटाळात वऱ्हाडी महिलांची गप्पांची मैफिल रंगली होती.
त्यामध्ये एक महिला म्हणाली..
“कावो तुले आला काय १५०० रुपयाचा मॅसेज??”
नाई वो माय मले त नाई आला अजून मॅसेज… काय माईत बॉ काऊन नाई आले त पैसे.
त्यात तिसरी म्हणते मले त वाटते आपले पैसे सरकार न निवडणुकीत खर्च करून टाकले वाटते..
मंग चवथीने म्हटले काई बी म्हणत काय व तू… इलेक्शन साठी अलग पैसे असतात. आपले बहिणीचे पैसे अलग काढून ठुवेल आयेत सरकारन
ते आपल्या गावात मुख्यमंत्री फडणवीस आलते त त्याईन म्हटलं न्हवत काय.. की मी मुख्यमंत्री असे लग लाडकी बहीण चे पैसे बंद हू देणार नाई म्हणून.. भुल्ली काय तू??
बसलेल्या मैफिलीतील एक महिला म्हणाली की ते एकनाथ शिंदे साहेबांच हेलिकॉप्टर आपल्या अठी उतरलं नाही तर त्यायन बी आपल्याले फोनवरून सांगतलं नव्हतं काय की हे योजना म्या आणेल हाय अन मी तुमचा भाऊ हाव… मंग आपल्याले कायजी काऊन करा लागते?? येतीलच आपले पैसे उशीर होईल फक्त..
नंतर एकीने म्हटले की ते फुलावाले म्हणतात की माली योजना हाय अन हे धनुष्य वाले म्हणतात माली योजना हाय अन घड्याळ वाले म्हणतात आम्हीच योजनेचे जनक हाव..मंग खरं खरं हे योजना कोणाची हाय व???
तिसरी महिला तिला थांबवत म्हणाली अव ते तसं नाई ना..ते तिघे ही एकाच सरकारमध्ये मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री आहेत. त्याईची युती सरकार आहे ना वरते.. आता त्याईनं खाली इलेक्शन साठी युती केली नाही म्हणून ते असे म्हणतात असे समजावण्याचा प्रयत्न केला.
मग एकीने पुन्हा विचारले काव ते मागच्या वर्षी ते आमदार अन मुख्यमंत्री च इलेकशन होत त्या वक्ती त ते सगळे म्हणत की लाडक्या बहिणीले आम्ही 1500 च्या जागी 2100 रुपये म्हयना देऊ पण 1 वर्ष व्हून गेलं तरी 2100 रुपये त आलेच नाहीत अन जे 1500 भेटत होते ते बी लवकर युन नाई रायले.
वेटाळातील महिलांची गप्पांची महफील रंगली असतानाच त्यापैकी एकीचा नवरा हे सर्व काही मजेशीर गोष्टी ऐकत होता. चर्चेत मधात हस्तक्षेप करत त्याने त्याच्या बायकोला विनोदी स्वरूपात म्हटले की लाडक्या बहिणीला 1500 भेटतात मंग आम्ही जवाई लोकाईन कोणाच वाईट केलं मंग आमाले बी 1500 नाईत 2100 भेटायले पाहिजे की नाई???
त्यावर सर्व महिलांमध्ये एकच हास्य कल्लोळ झाला त्यावर पत्नी म्हणाली तुम्ही लय रिकाम्या गोष्टी करता… सरकार काय साऱ्याईले फुकट पैसे वाटीनं काय?? असं म्हणत मैफिल उठली. जाता जाता महिला पुन्हा एकीला म्हणाली … ताले पैसे आले की सांगजो भर मले.
या मैफिली वरून लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्यांच्या मनात चिंता सुरू झाली आहे हे स्पष्ट होत असून शासनाने त्वरित लाडक्या बहिणींचे पैसे जमा करण्याची गरज निर्माण झाली आहे.