
तेल्हारा ता. (प्रतिनिधी): नंदकिशोर नागपुरे
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानसूर्य डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून, तेल्हारा शहरात ‘गुरु-शिष्य सन्मान रॅली’ या भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकल माळी समाज, तालुका तेल्हारा आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.
रॅलीचे नियोजन आणि वेळ
ही भव्य बाईक रॅली शनिवार, ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक ८:३० वाजता प्रारंभ होईल. रॅलीची सुरुवात शहरातील महात्मा ज्योतिबा फुले चौक येथून होणार आहे. महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आणि समाजातील एकोपा वृद्धिंगत करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
असा असेल रॅलीचा मार्ग
शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली मार्गक्रमण करणार आहे. याचा नियोजित मार्ग खालीलप्रमाणे राहील:
प्रारंभ: क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान
संत तुकाराम चौक
टाॅवर चौक
स्टेट बँक परिसर
लाठिया भवानी मंदिर
नगर परिषद शाळा क्रमांक २
प्रताप चौक
माळेगाव नाका
आठवडी बाजार
पुन्हा महात्मा फुले चौक मार्गे भागवत मंगल कार्यालय येथे रॅलीचा समारोप होईल.
समारोप आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम
रॅलीचा शेवट भागवत मंगल कार्यालय, तेल्हारा येथे होईल. या ठिकाणी आयोजित मुख्य कार्यक्रमात महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे व्याख्यान आणि अभिवादन सोहळा पार पडेल.
क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजव्यवस्थेतील गुरु-शिष्यांचे आदर्श प्रतीक आहेत. त्यांच्या विचारांची मशाल घराघरात पोहोचवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.”
आयोजक, जयंती उत्सव समिती, तेल्हारा.
आवाहन:
या ‘गुरु-शिष्य सन्मान रॅली’मध्ये तालुक्यातील समाजबांधवांनी, तरुणांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या दुचाकींसह सहभागी होऊन महापुरुषांना अभिवादन करावे, असे आवाहन सकल माळी समाज व जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.