
तेल्हारा ता. (प्रतिनिधी):नंदकिशोर नागपुरे
महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने सहदेवराव भोपळे विद्यालयात संस्थेचे संस्थापक तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ आजीवन सदस्य स्व. सहदेवराव उपाख्य दादासाहेब भोपळे यांच्या जयंतीनिमित्त भव्य समारोहाचे आयोजन करण्यात आले. या जयंतीदिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या तेल्हारा तालुक्यातील आजीवन सभासदांचा स्नेहमिलन सोहळा तसेच शाळेतील खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे होते, तर उद्घाटक म्हणून माजी आमदार संजय गावंडे उपस्थित होते. यावेळी केशव मेतकर, हेमंत काळमेघ, केशव गावंडे, सुरेश खोटरे, सुभाष बनसोड, दत्तात्रय जोध, आरिफअली मिरसाहेब, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, एकनाथराव तिडके, संचालक वीरेंद्र भोपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास तसेच शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख आणि स्व. दादासाहेब भोपळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर शाळेतील खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन माजी आमदार संजय गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकात महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे यांनी संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देत, आजीवन सभासदांच्या सहकार्याने संस्थेच्या कार्याला अधिक प्रेरणा मिळावी हा कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दादासाहेब भोपळे यांच्यासोबत व्यतीत केलेल्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन देशमुख यांनी महात्मा जोतिबा फुले व शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या बहुजन शिक्षणासाठीच्या महान कार्याचा गौरव केला. शैक्षणिक संस्था उभारणी करताना अनेक अडचणींवर मात करावी लागते आणि त्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत आवश्यक असते, असे त्यांनी नमूद केले. तसेच, “महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे यांनी स्थापन केलेल्या शाळेत अधिकाधिक उत्कृष्ट शैक्षणिक कार्य घडावे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था व महात्मा फुले शिक्षण संस्थेतील बांधिलकी भविष्यात अधिक दृढ राहील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद डॉ. विलास भांबुरकर, डॉ.प्रमोद झाडे, पुंडलिक अरबट,सिनेट सदस्य अविनाश बोर्डे,डॉ. विनायक बाजारे, डॉ. भास्कर कोरडे, अविनाश झाडे,प्रकाश गावंडे, तसेच महात्मा फुले शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुनील राऊत, संचालक प्रकाश खोब्रागडे, शिवशंकर मार्के, संचालिका अन्नपूर्णा बंड, साधना भोपळे, संस्थेचे आजीवन सदस्य तथा माजी प्राचार्य दिनकर भोपळे, सुरेश गिऱ्हे, अशोक वानखडे, चंद्रभूषण इंगळे, माजी मुख्याध्यापक प्रमोद जानोतकर, देविदास देशमुख, संस्था संचालक प्रा. कौस्तुभ भोपळे यांच्यासह दोन्ही संस्थांचे आजीवन सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पालकगण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक गणेश खानझोडे व डॉ. शंकर दूनघव यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य संतोषकुमार राऊत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे सहकार्यवाह तथा विभाग प्रमुख स्नेहल भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षिका व कर्मचारीवृंद यांनी अथक परिश्रम घेतले.