
तंत्रज्ञानावर आधारित आणि विश्वास भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ
स्वामींच्या मनोगताप्रमाणे कोणतेही कर्म करण्यास न चुकणे , हीच त्यांची श्रेष्ठ सेवा होय. या वाचून स्वेच्छेने कर्म करणे ती सेवा नसून केवळ ऐहिक, पारलौकिक स्वार्थाकरिता केलेला शुद्ध व्यापार होय. कारण सेवा ही प्रेम सूचक असून , खरे प्रेम असेल तर अंत:करण द्रविभूत होवून , सेवे वाचून राहवत नाही. प्रेम हे अहंकाऱ्याकडे जात नाही आणि विनम्र ,विनयी व्यक्तीची साथ आजन्म कधीच सोडत नाही. तसेच प्रेम हे अशी एक अद्भुत दिव्यौषधी आहे की , ते घेतलेला व्यक्ती सदैव प्रफुल्लित राहतो . म्हणजेच ती सेवकाला आयुष्यभर कधीही कोमेजू देत नाही. प्रेमात क्रिया असते , परंतु प्रत्येक क्रियेत प्रेम असेलच असे मात्र सांगता येत नाही. म्हणून प्रेमोपलब्धी शिवाय घेतलली सेवा घेणाऱ्याचा अहंकार वाढते आणि प्रेमोपलब्धी नंतर संत संगतीत राहून सेवा करून योग ज्ञानाचा अभ्यास केला असता आणि वैराग्यांनी युक्त होऊन श्रीगुरुचरणांची सेवा केली तर, याच सत्कर्माच्या योगाने त्या साधकाचे संपूर्ण अज्ञान नाहीशे होते व त्याचा अहंकार आत्मस्वरूपी स्थिर होतो. याप्रमाणे योगी, संत व विदेही सम्राट गजानन महाराज यांची तब्बल ३९ वर्षे अहोरात्र सेवा करणारे श्रीमंत संत श्री भास्कर महाराज हे सर्व परमार्थिक भाग्यांची जन्मभूमी असणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील सेवेचा आदर्श मूर्तीमंत पुतळा होत. त्यांच्या ११९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्य थोडेशे चिंतन.
श्रीकृष्ण प्रिया आईसाहेब रुक्मिणीदेवी यांच्या माध्यमातून पुराण प्रसिद्ध असलेल्या विदर्भ भूमितील सातपुडा पर्वतरांगेच्या अगदी कुशीत वसलेल्या आकोली जहागीर नामक गावातील श्रीमंत श्री रघुजीराजे भोसले यांचे शौर्य आणि धैर्यवान तसेच प्रजेवर पुत्रवत प्रेम करणाऱ्या मातब्बर सरदार श्रीयुत कर्ताजीराव पाटील जायले व त्यांच्या धर्मपत्नी सौ. पार्वताबाई यांना विवाहोत्तर कालखंडामध्ये बरीच वर्षे पर्यंत संतती न झाल्याचे अतिव दुःख होते. तेव्हा त्यांना गुरुवारी स्वप्नामध्ये एका दिव्य तेज:पुंज योगीराजांचे दर्शन झाले. त्यांनी सुपुत्रप्राप्ती करिता श्रीमद्भागवत महापुराणातील महर्षी कश्यपांनी देवमाता अदितीला सांगितलेले पयोव्रत करण्याची सल्ला देऊन, स्वप्नातच श्रीफळ प्रसाद म्हणून दिले. ” आतां स्वप्नाचि हें तुकलें l साचासरिसें ll ” या न्यायाने स्वप्नातून जागृती येताच प्रत्यक्ष नारळ पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी श्रींची आज्ञा शिरसावंद्य मानून पयोव्रताची यथासांङ्ग साधना करीत व्रतांती ब्राह्मण भोजनादी सोपस्कार पूर्ण करीत, सपत्नीक प्रसाद ग्रहण केला. तदनंतर चैत्र शुद्ध पौर्णिमेस हनुमान जयंतीच्या पर्वकाळावर संतश्री गजाननांनी योगीवेशात प्रत्यक्षात त्यांना दर्शन दिले. तेव्हा उभयतांनी त्यांचे विधिवत पूजन करून पंचपक्वान्नांचे सुग्रास भोजन दिले असता, श्रींनी त्यांना तुमची पत्नी गरोदर असून , तिच्या उदरी दातृत्व , नेतृत्व व शुरत्व संपन्न अखंड सेवाव्रती श्रीगुरुभक्तराज असा सर्वगुणसंपन्न सुपुत्र जन्माला येईल हा मनोरथपूर्तीचा आशीर्वाद प्रदान केला. त्याचे नाव भास्कर ठेवावे तोच पुढे आमचा सर्वश्रेष्ठ शिष्य होऊन, वेदप्रणित गुरुशिष्य परंपरेतील सेवेचा आदर्श मूर्तीमंत पुतळा होत, तुमच्यासह समस्थ भक्तोध्दारास कारणीभूत होईल. हे आशीर्वचन ऐकून पाटलांना अत्यानंद होताच तत्क्षणी ते अंतर्धान झाले. पुढे मार्गशीर्ष शुद्ध मोक्षदा एकादशी गीता जयंतीच्या पौराणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या पर्वकाळावर शके सतराशे बावीसला स्वतःची ओळख जगताला करून देण्याकरिता तेच भास्कर पाटील रूपाने अवतीर्ण झाले . ” क्षरला सागर गंगा ओघी मिळे l आपणचि खेळे आपणाशी ll” या तुकोक्तीनुसार जसा समुद्र हा आपल्या अमर्याद स्थितीतून च्युत होऊन उन्हाळ्यात सूर्यकिरणांच्या द्वारा वर जातो; नंतर मेघाच्या रूपाने वृष्टी करून गंगादि महानद्यांच्या ओघात मिसळतो; आणि त्या परत समुद्राला मिळतात. अशाप्रकारे समुद्रच स्वतः मेघ , गंगा इत्यादी मध्यंतरीच्या उपाधी धारण करून आपल्याशीच खेळत असतो. तद्वत या गुरुशिष्यद्वयांनी जगदोद्धारार्थ एक असतांना एकरूप होण्यासाठी गुरुशिष्यपणाची लीला केली. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायातील भगवान श्री ज्ञानेशांकडून निर्देशित आचार्योपासना म्हणजेच श्रीगुरुंच्या सेवेचा प्रत्यक्षात आचरणातून जगताच्या समोर आदर्श वस्तुपाठ घालून दिला. भक्तोध्दारार्थ परिभ्रमण करीत असताना शके १८२८ मध्ये बाळकृष्ण बुवा रामदासी यांचे घरी बाळापूर येथे दास नवमी उत्सवार्थ दुसऱ्यांदा आले असता त्याच ठिकाणी ” ऋण वैर हत्या l में तो न सुटे नेदिता ll ” दुसऱ्याकडून घेतलेले कर्ज, एखाद्याशी आमरण केलेले वैर आणि एखाद्याचा केलेला जीव घात , हे तीन जन्म जन्मांतरी देखील न देता व न घेता चुकत नाहीत. या नियमाने पूर्वाश्रमात वाघाची शिकार करतांना चुकून कुत्रा मारल्या गेल्याने तेच वैर कुत्र्याच्या रूपाने परिणत होऊन दशमीच्या दिवशी भास्कर पाटलांना त्यांनी चावा घेतला. भक्ताग्रास्तव श्रीगुरुंनी त्यांना तब्बल चौऱ्यांशी दिवस वाचविण्याचे आशिर्वचन दिले. त्याचवेळी त्यांनी सर्व गुरु भक्तांकडून श्रींचे मंदिर पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन घेऊन , अधिक चैत्र मासात देहू ,आळंदी ,पंढरपूर, नाशिक त्र्यंबकेश्वरादि सर्व तीर्थयात्रा पूर्ण करून , निज चैत्रात शेगावी परत आले.
आडगाव बु. ग्रामीचे निष्ठावंत भक्त निरुसिंह यांच्या त्रिदिवशीय धरण्यांती त्यांच्या श्रद्धेस्तव स्वतः गजानन महाराज भास्कर महाराजांसह अडगावी येऊन गुरुवार दिनी अखंड हरिनाम संकीर्तन सप्तारंभ केला . विश्वात्मक श्रीगुरु निवृत्तीनाथांनी भगवान श्री ज्ञानोबारायांना ज्याप्रमाणे कार्तिक वद्य त्रयोदशी शके १२१८ ला श्री क्षेत्र आळंदी येथे स्वहस्ते संजीवन समाधी दिली. त्याचप्रमाणे त्या इतिहासाची पुनरावृत्ती करीत श्री संत गजानन महाराजांनी स्वतःच्या शिष्याला अर्थातच भास्कर महाराजांना अतिपुरातन भगवान द्वारकेश्वराच्या मंदिरालगत आडगाव येथे शके १८२९ चैत्र कृष्ण पंचमी गुरुवार दि.२.५.१९०७ ला स्वहस्ते संजीवन समाधी देऊन १९१० पर्यंत स्वशिष्याच्या चार यात्रा स्वतः करीत गुरुशिष्य सेवेला पुरस्कृत केले. आणि आजही श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावच्या माध्यमातून राजऐश्वर्यासह तो सोहळा संपन्न होऊन , आदर्श गुरु सेवेचा सन्मान केल्या जातो आहे.
श्री ज्ञानेश्वरदासानुदास.
भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ. श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर.श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.