
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी
मेळघाट परिसरातील आदिवासी व स्थानिक नागरिकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले सेमाडोह येथील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. वनविभागाकडून लावण्यात आलेली बंदी उठवण्यात आल्याने स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक भावना पुन्हा एकदा जागृत झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मेळघाटातील प्रमुख देवस्थानांवरील बंदी हटवावी, अशी मागणी जोर धरत होती. या बंदीत सेमाडोह येथील भुमकाबाबा, हतरू येथील डवरादेवबाबा, तारुबांदा येथील कांद्रीबाबा तसेच कोकमार येथील नरसिंगबाबा या देवस्थानांचा समावेश होता. ही सर्व ठिकाणे आदिवासी बांधवांच्या परंपरा, संस्कृती आणि आस्थेशी निगडित असल्याने बंदीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर आमदार केवलराम काळे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे पाठपुरावा करत पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानंतर परतवाडा येथील विश्रामगृहात वनविभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक निर्णय घेत भुमकाबाबा मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थ, आदिवासी बांधव आणि भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. उर्वरित देवस्थानांवरील बंदीही लवकर उठवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या बैठकीत मेळघाटातील विकासकामांचाही आढावा घेण्यात आला. झरी–धुळघाट, सिमोरी–कोही आणि सेमाडोह–माखला या रस्त्यांच्या कामांसह बोराट्याखेडा येथील पाण्याच्या टाकीला परवानगी तसेच बीएसएनएल टॉवर उभारणीसंदर्भातही महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
बैठकीला मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी, तसेच वनविभागाचे अधिकारी, ग्रामसमिती पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या श्रद्धास्थानांवर घालण्यात आलेली बंदी अन्यायकारक होती. स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन भुमकाबाबा मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. उर्वरित देवस्थानांवरील बंदीही लवकर हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच मेळघाटातील रस्ते, पाणी व दळणवळण सुविधा सुधारण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.”
आमदार मेलघाट विधानसभा – केवलराम काळे