
गुरुदेव ईसमोरे (संपादक विदर्भ एक्सप्रेस न्यूज)
अकोला जिल्ह्यातील पाथर्डी येथील प्राचीन हनुमान संस्थान हे सुमारे 300 वर्षांची परंपरा जपणारे श्रद्धास्थान असून, द्रविड शैलीतील दगडी बांधकामामुळे हे मंदिर ऐतिहासिक व वास्तुशास्त्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
हनुमान जयंतीच्या पावन पर्वानिमित्त दुसऱ्या दिवशी पाथर्डी येथे दरवर्षी भव्य यात्रा भरते. ही यात्रा नेमकी कोणी सुरू केली याची स्पष्ट नोंद नसली तरी शेकडो वर्षांची ही परंपरा आजही गावकरी अत्यंत भक्तिभावाने जपत आहेत.
या मंदिराशी संबंधित एक अद्भुत घटना आजही गावकऱ्यांमध्ये श्रद्धेने सांगितली जाते. 1965 साली आलेल्या महापुरात मंदिरासमोरील विद्रुपा नदीला पूर आला होता. पुराचे पाणी मंदिराच्या तिसऱ्या पायरीपर्यंत पोहोचले असताना मंदिरातून अचानक आरोळीचा आवाज ऐकू आला आणि काही वेळातच पाणी ओसरले, अशी आख्यायिका आहे. विशेष म्हणजे त्या घटनेपासून मंदिराच्या भिंतीला पडलेली तिरपी भेग आजही पाहायला मिळते, असे ग्रामस्थ सांगतात.
यात्रेच्या दिवशी गावातून पारंपरिक रथ मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीदरम्यान प्रत्येक घरासमोर सडा-रांगोळी काढून रथाचे स्वागत केले जाते. महिला भगिनींकडून रथाचे पूजन करण्यात येते, तर ठिकठिकाणी भाविकांसाठी थंड पाण्याची व्यवस्था केली जाते.
पंचक्रोशीतून टाळकरी व भजनी मंडळी, ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या संख्येने सहभागी होतात. या यात्रेत हजारो भाविक दर्शनासाठी येतात.विशेष आकर्षण म्हणजे महाप्रसाद वांग्याची भाजी, पोळी आणि गुळाचा शिरा याला भाविकांमध्ये मोठे धार्मिक महत्त्व आहे. सायंकाळी हजारो भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात.पाथर्डी गावात या काळात भक्तिमय वातावरण निर्माण होते. गाव सोडून गेलेले नागरिक, नोकरदार वर्ग तसेच विवाहिता महिला सुद्धा या दिवशी आवर्जून गावात येऊन दर्शन घेतात.या संपूर्ण यात्रेचे नियोजन हनुमान संस्थान, गावकरी, तरुण मंडळी, महिला मंडळ व जेष्ठ नागरिक यांच्या संयुक्त सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते.अशा या श्रद्धा, परंपरा आणि भक्तीच्या संगमातून पाथर्डीची हनुमान जयंती यात्रा दरवर्षी अधिक भव्य आणि प्रेरणादायी ठरत आहे.