
रामेश्वर कावरे :-
अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट : अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारूविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवत विविध ठिकाणी धडक कारवाया केल्या. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत हातभट्टीसह अवैध देशी दारू विक्रेत्यांवर कारवाई करत एकूण ५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्राम शहानुर येथे सुरू असलेल्या रनींग हातभट्टीवर छापा टाकून तब्बल ७३,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर ग्राम अकोलखेड येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करत १०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच ग्राम बोर्डी येथे १०,१०० रुपये, ग्राम मुंडगाव येथे ५,२०० रुपये आणि ग्राम करतवाडी येथे ५,३०० रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व कारवायांमध्ये एकूण पाच आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि सहायक पोलीस अधीक्षक निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या अंमलात आणली.
या धडक मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत करत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.