
उमरा प्रतीनिधी:-
रामेश्वर कावरे
उमरा परिसरासह विदर्भातील कापूस बाजारात सध्या तेजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. कापसाचे दर वाढत असले तरी या वाढीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी आर्थिक अडचणी, कर्जफेडीची गरज आणि साठवणुकीच्या सुविधांचा अभाव यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस कमी दरात विकून टाकला होता. त्या वेळी दर समाधानकारक नसतानाही परिस्थितीपुढे झुकून शेतकऱ्यांना विक्री करावी लागली.
मात्र आता बाजारात तेजी आली असताना अनेक शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कापूसच उरलेला नाही. परिणामी, सध्याच्या वाढलेल्या दरांचा फायदा थेट व्यापारी आणि साठेबाज यांच्या खिशात जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
ही परिस्थिती शेती व्यवस्थेतील गंभीर विसंगती अधोरेखित करणारी आहे. एका बाजूला दर वाढत असले तरी योग्य वेळी योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कायम तोट्यातच राहत आहे. बाजारातील चढ-उताराचा फायदा मध्य स्थांकडेच जात असल्याची वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.
तज्ज्ञांच्या मते, कापूस साठवणुकीच्या सुविधा वाढवणे, शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत उपलब्ध करून देणे आणि बाजार पेठेत पारदर्शकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय हमी भावा ची प्रभावी अंमलबजावणीही तितकीच महत्त्वाची ठरते.
एकंदरीत, कापसाच्या दरातील ही तेजी कागदोपत्री सकारात्मक असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात मात्र “रिकामीच पिशवी” उरते, हीच खरी शोकांतिका आहे.