
तेल्हारा तालुका प्रतिनिधी :-नंदकिशोर नागपुरे
बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेली संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोगोडा येथे हनुमान मंदिर समिती व समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संगीतमय भागवत कथेची’ हनुमान जयंतीला मोठ्या उत्साहात सांगता झाली. रामनवमी ते हनुमान जयंती या काळात रंगलेल्या या सोहळ्याने संपूर्ण गाव भक्तीच्या रसात न्हाऊन निघाले होते.
संस्कारांची शिदोरी आणि सुश्राव्य निरूपण
या सात दिवसीय ज्ञानयज्ञाचे प्रवक्तेपद ह.भ.प. वैष्णवी किशोरीदीदी (अंबोडा) यांनी भूषविले. आपल्या अमृततुल्य वाणीतून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कथेदरम्यान त्यांनी जीवनाचे सार मांडताना सांगितले की, “जीवन कसे जगावे आणि आपला शेवट कसा गोड व्हावा, यासाठी भागवत कथेचे श्रवण अनिवार्य आहे. आज आपण आपली संस्कृती आणि संस्कार विसरत चाललो आहोत. घर संस्कारमय असेल आणि आपल्याला धर्मग्रंथांची माहिती असेल, तर भविष्यात कोणत्याही दुःखाला सामोरे जावे लागणार नाही.”
कथेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या विविध बाललीलांचे जिवंत दृश्य कथेच्या माध्यमातून सादर करण्यात आले, ज्याने भाविक भारावून गेले होते.
हनुमान जयंतीला भव्य सांगता
आज २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. कथेच्या सांगता प्रसंगी गावातून भव्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ आणि ‘बजरंग बली की जय’च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
ठळक वैशिष्ट्ये:
आयोजक: हनुमान मंदिर समिती व समस्त ग्रामस्थ, सोगोडा.
कालावधी: श्री रामनवमी ते हनुमान जयंती.
प्रमुख उपस्थिती: परिसरातील हजारो भाविक भक्त आणि ग्रामस्थ.
या सोहळ्याच्या यशस्वीते साठी हनुमान मंदिर समितीच्या सदस्यांनी आणि सोगोडा येथील तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. महाप्रसादा च्या वाटपाने या सोहळ्या ची सांगता झाली.