
प्रभाकर बोरकर:-
अकोट तालुका प्रतिनिधी– बोरगाव वैराळे परिसरात अनेक वर्षांपासून भक्तांची अखंड श्रद्धा असलेली मरिमाता आजही “हाकेला धावणारी” देवी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धेने नवस बोलतात आणि देवी त्यांच्या मनोकामना पूर्ण करते, अशी भाविकांची ठाम धारणा आहे.
गावकऱ्यांच्या मते, पूर्वी गावाच्या हद्दीत झाडाखाली या देवीची स्थापना करण्यात आली होती. काळानुसार मंदिराचे रूपांतर झाले असले तरी देवीबद्दलची श्रद्धा अधिकच वाढत गेली आहे. विशेषतः गुढीपाडवा, नवरात्र उत्सव आणि इतर धार्मिक सणांच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी उसळते.
नवरात्र उत्सवात दररोज पूजा, आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परिसरातील तसेच बाहेरगावाहूनही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. या काळात मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.
मरिमाता ही गावकऱ्यां साठी केवळ श्रद्धास्थान नसून त्यांच्या सुख-दुःखात साथ देणारी आई मानली जाते. त्यामुळेच बोरगाव वैराळे येथील हे देवस्थान आजही जागृत व नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध आहे.