
तेल्हारा तालुका प्रतिनिधी :- नंदकिशोर नागापुरे
दानापुर येथील श्री संत गोरोबा बाबा मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. ५ ते ७ मार्च या तीन दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची सांगता भव्य महाआरती व महाप्रसादाने करण्यात आली.
विविध धार्मिक विधींचे आयोजन
सोहळ्याची सुरुवात शास्त्रोक्त पद्धतीने गणेशपूजन व विविध पूजाविधींनी झाली. त्यानंतर धान्याधिवास, जलाधिवास, फलाधिवास आणि शय्याधिवास असे संस्कार मूर्तीवर करण्यात आले. मुख्य पुरोहितांच्या मंत्रोच्चारात मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. ७ मार्च रोजी सकाळी ११:०० वाजता मुख्य आकर्षण असलेला ‘नेत्रोन्मीलन विधी’ पार पडला. यावेळी उपस्थितांनी केलेल्या “जय गोरोबा, जय गुलाब बाबा” या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दणाणून गेला होता.
भव्य शोभायात्रा आणि सांस्कृतिक उत्साह
या सोहळ्यानिमित्त गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यामध्ये गावातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या यात्रेत दानापूर, खापरखेड, सोगोडा, नागवेली येथील ढोल-भजन मंडळ सांप्रदाय भजन मंडळ तसेच चंडिकापूर येथील महीला भजन मंडळांनी सहभाग घेतला. वारकरी भजनांच्या सुरांनी संपूर्ण गावातील वातावरण विठ्ठलमय झाले होते.
नियोजन आणि सांगता
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष गोपालाभाऊ तळोकार यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी अहोरात्र परिश्रम घेतले. प्राणप्रतिष्ठा विधीनंतर झालेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. या सोहळ्यामुळे दानापूर परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले .