
सतोष विणके:-अकोट प्रतिनिधी
लोहारी खु राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा लोहारी खुर्द येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनी उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा आणि विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने विज्ञान शिक्षिका सोनाली निचळ यांच्या संकल्पनेतून या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित नाविन्यपूर्ण मॉडेल सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक नितीन धोरण यांच्या हस्ते नोबेल पारितोषिक विजेते भारतरत्न डॉ सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी शिक्षिका सोनाली निचळ यांनी विज्ञान हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून दैनंदिन जीवनाशी जोडलेले आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. मुख्याध्यापक नितीन धोरण यांनी विज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुलभ झाले असून विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा दूर ठेवून वैज्ञानिक विचारसरणी स्वीकारण्याचे आवाहन केले. तर रुपाली ढवळे यांनी विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले.
प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत विविध विषयांवर आधारित कमी खर्चात तयार करता येणारी २४ उपयुक्त वैज्ञानिक उपकरणे सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण आत्मविश्वासाने करत त्यामागील वैज्ञानिक तत्त्वे सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आत्मविश्वास वाढण्यासोबतच प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शापोआ कर्मचारी भुजिंगराव इंगळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.