
तेल्हारा प्रतिनिधी :-
आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी पाथर्डी येथील निळकंठ सपकाळ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित सेने अंतर्गत वृक्षतोड थांबवा, पर्यावरण वाचवा या विषयावर पथनाट्याचे पाथर्डी येथील चौका चौकात सादरीकरण केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची सर्वप्रथम गावातून पर्यावरण जागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीदरम्यान इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी झाडे लावा,झाडे जगवा. करशील वृक्षावर माया, तर मिळेल थंडगार छाया. यासारख्या घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी सर्व गावातील लोकांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण केली. तसेच वृक्षांचे महत्व समजावून सांगताना पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. वृक्षांचे फायदे आणि वृक्षतोडीचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून गावातील लोकांसमोर मांडले. राष्ट्रीय हरित सेने अंतर्गत निळकंठ सपकाळ विद्यालयाचे विद्यार्थी विविध उपक्रम राबवत असून यामध्ये विविध प्रकारच्या वृक्षांच्या बियांचे संकलन करणे, महाशिवरात्रि पर्वावर बेलाचे महत्व, होळी सणानिमित्त लाकूड तोडण्याऐवजी गोवऱ्यांचा वापर करणे मकर संक्रांतीला नायलॉन मांजाचा वापर न करण्याची शपथ घेणे असे उपक्रम विद्यालयामार्फत राबविले जात आहेत. या उपक्रमासाठी वनविभागाचे गिरनार साहेब तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एन.पी.मेतकर सर, प्रभारी शिक्षक श्री भिकासिंग घोती सर, कु. भटकर मॅडम, श्री दबडघाव सर, श्री राठोड सर,श्री डोंगरे सर, श्री मानकर सर व श्री कुकडे सर यांनी मार्गदर्शन केले.