
तेल्हारा प्रतिनिधी :- पाथर्डी :
पाथर्डी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रगट दिन उत्सव अत्यंत भक्तीभाव, उत्साह आणि श्रद्धेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासून मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी दिसून येत होती. गावात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
प्रगट दिनानिमित्त सकाळी श्री संत गजानन महाराजांचा अभिषेक संतोषराव वसंतराव कुकडे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर सकाळी सहा वाजता आरती झाली. अकराच्या आरतीनंतर महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात आली.
या महोत्सवात गावातील सेवाधारी महिला गटांचे विशेष सहकार्य लाभले. महाप्रसादाच्या नियोजनात आणि वितरणात महिलांनी मोलाची सेवा बजावली. याशिवाय गावातील तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनीही उत्साहाने सहभाग घेत महाप्रसाद वितरणात हातभार लावला.
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे जसा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, तसाच उत्साह पाथर्डी येथेही पाहायला मिळाला. महाराष्ट्रासह देश-विदेशात साजरा होणारा हा पवित्र दिवस पाथर्डीतही भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
संध्याकाळी साडेआठ ते साडेदहा या वेळेत हभप कुमारी नम्रता संजय नेरकर हरिकीर्तना चे आयोजन करण्यात आले असून, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
एकूणच श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त पाथर्डी गाव भक्ती, सेवा आणि श्रद्धेच्या वातावरणात न्हाऊन निघाले.