
विनके अकोट प्रतिनिधी
आकोट.
हिंदू समाज संघटित झाला तरच देश बलशाही होऊ शकतो. म्हणून धर्म रक्षणार्थ राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी हिंदू संघटीत होणे ह्याची आज आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प.पू. कनकेश्वरी देवी यांनी आकोट येथे विराट हिंदू संमेलनात गुरुवार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी श्री संत नरसिंग महाराज मंदिराचे पटांगणात आपल्या मधुर वाणीतून व्यक्त केले.
ह्या विराट हिंदू संमेलनाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मंडलेश्वर प.पू. कनकेश्वरी देवी, प्रमुख वक्ते म्हणून प्रा. विवेकजी बिडवई तर अकोला जिल्हा संघचालक ॲड्. मोहनराव आसरकर, डॉ. सुहास कुलट, नेत्रतज्ञ, ह.भ.प. अशोक महाराज जायले, श्री चरणसिंग ठाकूर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्व प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीराम व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्प देऊन करण्यात आले.
प.पू. कनकेश्वरी देवी ह्यांनी आपल्या मधुर वाणीतून आपल्या समाजातील तसेच घरातील संस्कारविषयी दुःख व्यक्त केले की, आपल्या घरातील व्यक्तीचं जर आपले संतान ऐकत नसेल तर समाज, धर्म, राष्ट्र एकत्र होऊ शकतील कां? अशी शंका निर्माण केली. आपल्या भारतभूमीतच संत, महंत, श्रीराम, श्रीकृष्ण यांनी जन्म घेतला. चांगले विचार व आचार निर्माण झाले पाहिजेत, असे संस्कार घराघरात निर्माण होणे आवश्यक आहे. तरच भारताची अखंड संस्कृती टिकून राहील. हिंदू समाजाला संघटित करणे व धर्म रक्षणार्थ राष्ट्र भावना जागृत करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे मत व्यक्त केले.
प्रा. विवेक बिडवई यांनी आपल्या उद्बोधनातून हिंदू समाजाने आपल्या मूळ राष्ट्रीय धारेला चिटकून राहिले पाहिजे तरच भारताची प्रगती होईल. हीच भावना लक्षात घेऊन संघाने शंभर वर्षांपासून समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. समाजाची स्थिती बदलण्याचे काम कोणीही एक व्यक्ती करू शकत नाही. कोणताही पक्ष, सरकार, संघटना किंवा नारा देऊनही होऊ शकत नाही त्यासाठी समाजाची स्थिती बदलायची असेल तर ती इच्छा समाजाने निर्माण केली पाहिजे तरच समाज बदलू शकतो यासाठी संघाने पंच परिवर्तनाच्या नावाचा विषय सुरू केला आहे. यामध्ये कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्व आधारित जीवनशैली नागरि कर्तव्य व सामाजिक समरसता हे समाज परिवर्तन घडवून आणतील, असा विश्वास प्रा. बिडवई यांनी व्यक्त केला. देश, धर्म, संस्कृती, परंपरा रक्षणाचे कार्य व जनजागृतीचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. संघाच्या हिंदू जागरण कार्यात समाजाने हातभार लावावा, असेही आव्हान त्यांनी ह्यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हरीश ढवळे यांनी केले व वैयक्तिक गीत दीपकजी तळोकार यांनी गाईले. विराट हिंदू समाज द्वारा आयोजित संमेलनात आकोट नगरातील हिंदू समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आरती व प्रसादाचे वितरण करण्यात आले.