
तेल्हारा प्रतिनिधी :-
आज रोजी मुळाक्षरापासून तर शब्दार्थ पर्यंत समृद्ध असलेल्या व अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या मराठी भाषेतील संवाद , संवेदना आणि समाज या सकाराने युक्त शब्दातील ‘ स ‘ हे अद्याक्षर पूर्णतः गहाळ झाल्यामुळे आता केवळ वाद , वेदना आणि माजच शिल्लक राहिलेला असुन , उपरोक्त गोष्टींना जीवनातून कायमस्वरूपी संपवायचे असल्यास त्या ‘ स ‘ अक्षराला पुन्हा स्वस्थानी सन्मानपूर्वक स्थापन करून सर्वांनी सकारात्मक होत संस्कृतीनिष्ठ झाले पाहिजे. विज्ञानाचा अविष्कार असणाऱ्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संपूर्ण विश्व आपल्या मुठीत आल्यामुळे जागतिक स्तरावरील संपर्क वाढला . परंतु घराघरातील संवाद मात्र संपल्यामुळे नात्यातील ओलावा संपून कुटुंब व्यवस्था पूर्णतः शुष्क होऊन खिळखिळी झाल्याचे निदर्शनास येत आहे. तिला पुनश्च पूर्ववत रसरशीत बनविण्यासाठी कौटुंबिक संवादावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे. किंबहुना समाज व्यवस्था समृद्ध करण्यासाठी सामूहिक विवाह काळाची तर, सामूहिक सुसंवाद ही मानवी जीवन मूल्यांच्या संरक्षणार्थ जीवनाची गरज आहे असे अभ्यासपूर्ण मत भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ स्थित संतश्री वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर येथे नाताळच्या सुट्टीत पर्यटन व दर्शनाच्या निमित्ताने आलेल्या बहुसंख्या पालक व पाल्यांची अनौपचारिक चर्चा करीत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीतील सुसंस्कार हे संवादाच्याच माध्यमातून पिढी दर पिढी संक्रमित होत आल्याचे दिसून येते. भारतीयांच्या कडू गोड अनुभवांनी परिपूर्ण असणाऱ्या सत्यनिष्ठ इतिहास स्वरूप रामायण, महाभारतादिक ग्रंथातील शूरवीरांच्या गोष्टी राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊंनी संवादाच्या माध्यमातून बाल शिवबांच्या मनावर खोलवर रुजविल्यानेच त्यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी भगवान रायरेश्वराला रक्ताभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापनेची भीष्मप्रतिज्ञा करून , ती भगीरथ प्रयत्नांनी ती अल्पावधीतच पूर्णही केली . हा चमत्कार नसून कौटुंबिक संवादाच्या उपलब्धीचा ऐतिहासिक अविष्कार आहे.
संस्कारा शिवाय दिल्या जाणारी सुविधा हे स्वैराचाराच्या माध्यमातून पतनाला कारणीभूत होत असते . म्हणून एखाद्या वेळी आपल्या पाल्याला एखादी सुविधा आपण जर देऊ शकलो नाही तर ; तो कदाचित थोडा वेळ रडेलही परंतु त्याला जर संस्कार दिले नाही तर ; त्याच्याबरोबर आपल्याला सुद्धा प:श्चातापदग्ध होऊन आजन्म रडावेच लागेल. म्हणून आपल्या पाल्यांना सुविधा , संपत्ती , सत्तेचे हक्कदार बनविण्याआधी संस्काराचे वारसदार बनविले पाहिजे तरच ते उपरोक्त सकारात्मक गोष्टींचा स्वतःसह समाजोद्धाराकरिता सदुपयोग करून आपल्या कुळाला गौरवान्वित करणारे शिलेदार बनतील . म्हणून पालकांनो ! आपल्या पाल्यांना सुविधेपेक्षा संवादाला वेळ द्यावा.
आज सभोवताली वातावरण स्पर्धात्मक शिक्षणाचे असल्यामुळे बालक शिक्षणाकरिता सहज प्रवृत्त होतात. परंतु संयुक्त कुटुंब हे विभक्त झाल्यामुळे संस्काराचे केंद्रबिंदू असणारे आजी आजोबा तसेच रक्तांच्या नात्यातील नातेवाईकांची वानवा असल्यामुळे संबंधमुलक प्रीती पेक्षा गौरवमूलक प्रीतीचाच बोलबाला दिसून येतो . त्यामुळे गोकुळासारख्या असलेल्या एकत्रित कुटुंब पद्धतीत संवादाच्या माध्यमातून जो हिताहिताचा विचारविनिमय होत होता तो न होता , आता केवळ वैयक्तिक स्वार्थाचाच विचार केला जात असल्याने देवाणघेवाण जोपर्यंत सुरळीत चालू आहे तोपर्यंतच ते संबंधित लोक नातेवाईक असतात . व त्यात काही कारणांनी अडचणी निर्माण झाल्यास त्यांचे नाते वाईट होण्याकरिता वेळ लागत नाही. म्हणून विभक्त कुटुंब पद्धतीतील पालकांनी स्वतःच्या बालकांच्या उज्वल भविष्याकरिता त्यांना सुविधा वा संपत्ती पेक्षाही संस्कृती व संस्काराचे धडे तसेच सुसंवादा करिता वेळ सुद्धा देणे अधिक गरजेचे आहे. तरच जागतिक स्पर्धेच्या नावाखाली संप्रदाय द्रोही स्वार्थांधांनी कृत्रिमरीत्या निर्माण केलेला हा अज्ञानधंकार स्वधर्मरुपी ज्ञान सूर्याचा उदय होऊन पूर्णतः नष्ट होत, पुनश्च संस्कृतीची सकाळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संस्कार, संस्कृती व संवाद या त्रिसूत्रीच्या संवर्धनार्थ समाज सुधारकांनी सर्वांशी संपर्क साधून शासकीय स्तरावर साजरा केला जाणाऱ्या अनेक सप्ताहाप्रमाणे एखाद्या सुसंवादाचा सार्वजनिक सप्ताह आयोजित करून समाजात समन्वय घडून आणला पाहिजे. असा आग्रह केल्याचा श्रीयुत ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.