
तेल्हारा तालुका प्रतिनिधी :- नंदकिशोर नागपुरे
संग्रामपूर तालुक्यातील
बोरखेड व सोगोडा शिवारात सलग तीन वर्षांपासून संत्रा पिकावर झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या परिस्थितीमुळे सात शेतकऱ्यांनी सुमारे २५ एकर क्षेत्रातील आठ ते बारा वर्षे वयाच्या संत्रा बागा नष्ट केल्या आहेत.
बोरखेड व सोगोडा शिवारातील सुमारे ९५ टक्के क्षेत्र बागायती असून, जमिनीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गेल्या बारा वर्षांपासून या परिसरात संत्रा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली.
चार वर्षांपूर्वी संत्रा उत्पादनामुळे काही शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले होते; मात्र मागील तीन वर्षापासून परिस्थिती बदलली आहे. बुरशीजन्य रोगाने संत्रा पिकावर आक्रमण केल्याने झाडे पिवळी पडत असून, फांद्या वाळत आहेत.
कृषी विभागाविषयी नाराजी*
या संपूर्ण परिस्थितीत कृषी विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून पीक व्यवस्थापनाबाबत अपेक्षित मार्गदर्शन मिळाले नसल्याची तीव्र नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे. योग्य वेळी मार्गदर्शन व उपाययोजना मिळाल्या असत्या, तर संत्रा बागा वाचू शकल्या असत्या, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
खर्च वाढला, उत्पन्न घटले!*
एक एकर संत्रा पिकासाठी मशागत, रोटर मारणे, वाळलेल्या साली काढणे, रासायनिक खते, फवारणी तसेच झाडाच्या बुंध्याजवळील गवत काढणे यासाठी किमान ४० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.
कोड…
चार एकर संत्रा बाग उभी करण्यासाठी मोठा खर्च व मेहनत घेतली; मात्र दोन वर्षांपासून बाग फुललीच नाही. यावर्षी रोगामुळे झाडे खराब झाली. त्यामुळे ती उपटून टाकली.
विजय अढाऊ, शेतकरी, दानापूर.
कोड…
तीन एकर क्षेत्रातील दहा वर्षे वयाच्या संत्रा बागांना चार वर्षापासून वातावरणातील बदलांचा फटका बसला. मृग व आंबिया बहारात फळधारणा झाली नाही.
प्रमोद इंगळे, शेतकरी, सोनाळा.