
देवडी
प्रतिनिधी :-
सचिन वैद्य
देवळी तालुक्यातील भिडी गावातून जाणाऱ्या घोडी नाल्यावर पूल व रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. 2025 च्या पावसाळ्यात नाल्याचा प्रवाह वाढून तो मुख्य रस्त्यावरून वाहू लागल्याने रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर खच झाला आहे. सध्या हा मार्ग नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे.
गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत 2 ते 3 नागरिक थेट नाल्यात पडल्याच्या घटना घडल्या असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या धोकादायक स्थितीचा थेट परिणाम म्हणून पुलगाव–भिडी एस.टी. बस सेवा पूर्णतः बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना शिक्षण, उपचार व दैनंदिन कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण गावाचा दळणवळण संपर्कच तुटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पारस चोरे व समस्त गावकऱ्यांनी संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा केला. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस दुरुस्ती, संरक्षण भिंत, पूल किंवा तात्पुरती सुरक्षितता उपाययोजना करण्यात आलेली नाही.
या संदर्भात देवळी–पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. राजेश बकने साहेब यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष पारस चोरे यांच्यासह गावातील पांडुरंग डफरे ,सुधाकर गुडफुडे,मोहन चोधरी,संतोष गुडफुडे ,विवेक शेंडे ,ऋत्विक धोटे, प्रशांत दौतपुरे नागरिक, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी बोलताना पारस चोरे यांनी प्रशासनाला स्पष्ट व अंतिम शब्दांत इशारा दिला की,
“जर येत्या 8 ते 10 दिवसांत घोडी नाला, रस्ता व पुलावर ठोस आणि प्रत्यक्ष उपाययोजना करण्यात आली नाही, तर मी स्वतः समस्त गावकऱ्यांसह नाल्यात उतरून तीव्र आंदोलन करणार आहे.”
तसेच या कालावधीत किंवा त्यापूर्वी कोणतीही अनुचित घटना किंवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासन व जिल्हा परिषद यांची राहील, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.
नागरिकांचा जीव व दळणवळण सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अटळ असल्याची अंतिम चेतावणी या वेळी देण्यात आली.