
तेल्हारा तालुका प्रतिनिधी : नंदकिशोर नागपुरे
गुरुकृपा व परिसरातील सहा ते सात गावांच्या सहभागातून २१ डिसेंबर रोजी जागतिक ध्यान दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रामोत्सव व मेडिटेशन कार्यक्रम दानापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
हा कार्यक्रम हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय, दानापूर येथे सकाळी १० ते रात्री ९:३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता.
या ग्रामोत्सवामध्ये दानापूर, सोगोडा, मुंडगाव, रायखेड, चांगलवाडी, तेल्हारा व हिवरखेड या गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पूर्ण दिवसभरात जवळपास ६०० हून अधिक स्पर्धकांनी विविध खेळ व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.
कार्यक्रमात हॉलीबॉल, मुला-मुलींसाठी १०० मीटर धावणे, खो-खो, गोळा फेक, थालीफेक यांसह पारंपरिक भजन स्पर्धा, गरबा डान्स, योगा डान्स, सोलो डान्स, कराओके गायन, समाजप्रबोधनपर नाटिका तसेच महाकालेश्वर डमरू पथक, दानापूर यांचे विशेष सादरीकरण झाले.
या सर्व स्पर्धांचे परीक्षण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिल्हा महिला प्रचारक
श्रीमती संगीता ताई गावंडे यांनी परीक्षक म्हणून केले.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग घेतला.
खेळ व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य, खेळाडूवृत्ती व सामाजिक एकोपा तसेच सांघिक भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तसेच श्री श्री रविशंकर यांनी ध्यानाच्या माध्यमातून जगाला दिलेल्या आनंद, समाधान व आंतरिक शक्तीच्या अनुभूतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. सर्व कार्यक्रमांच्या सांगतेनंतर गुरुदेवांसोबत जागतिक मेडिटेशन करण्यात आले.
स्पर्धेत सहभागी सर्वांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सर्व सहभागी गावांतील आर्ट ऑफ लिव्हिंग स्वयंसवेकांनी महिनाभर केलेल्या अथक सेवेमुळे व गुरुकृपेमुळे हे भव्य आयोजन यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.