
तेल्हारा प्रतिनिधी:-
शताब्दी महोत्सवाच्या अनुषंगाने दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सेठ बन्सीधर विद्यालयाच्या प्रांगणात ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणेकर) यांच्या अमृतवाणीतून भव्य हरिकीर्तन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.हा कार्यक्रम शताब्दी महोत्सवाचा पुष्प चौदावा ठरला.या पावन प्रसंगी पंचक्रोशीतील पंधरा हजारांहून अधिक भाविकांनी—लहानांपासून वृद्धांपर्यंत महिला व पुरुषांनी—उपस्थिती लावून विद्यालयाचा प्रांगण भक्तिरसात न्हाऊन काढला.महाराजांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीतून भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाराजांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
प्राथमिक विभागाच्या लेझीम पथकासह व स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या वारकरी दिंडीसोबत महाराजांचे श्रोत्यांच्या अथांग सागरातून व्यासपीठाकडे भव्य आगमन झाले.कीर्तनादरम्यान महाराजांनी आपल्या अमृतवाणीतून सेठ बन्सीधर विद्यालयाच्या व्यवस्थापक मंडळाचे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे भरभरून कौतुक केले व “महाराष्ट्रातील आदर्श शाळेपैकी एक” असा गौरवपूर्ण उल्लेख केला.शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने महाराजांचा व टाळकरी मंडळाचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात प्राथमिक विभागाचे सतीश मानकर सर यांच्या कन्येने साकारलेली विठ्ठल-रुक्माईची वेशभूषा तसेच इयत्ता ५ ते ७ मधील महिला शिक्षिकांनी साकारलेली विठ्ठलाची रांगोळी भाविकांचे विशेष आकर्षण ठरली.या पवित्र सोहळ्यास महाराजांचे आई-वडील उपस्थित असणे हा दुग्धशर्करा योग ठरला.
कार्यक्रमाचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ड्रॉ पद्धतीने महाराजांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील तसेच बेलखेड येथील स्वयंसेवक मंडळाने अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभागाचे श्री. प्रदीप हरिदास राऊत यांनी केले.यावेळी विद्यार्थी तन्मय चिकटे याने रेखाटलेले महाराजांचे हुबेहूब रेखाचित्र तसेच सौ. सविता प्रदीप राऊत यांनी रचलेली भावस्पर्शी कविता महाराजांना भेट देण्यात आली. तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष गोपालदास शिवदासजी मल्ल, उपाध्यक्ष बेनिप्रसादजी झुनझुनवाला, व्यवस्थापक राजेंद्रजी शाह, कोषाध्यक्ष अभिजीत शाह,
स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाचे अध्यक्ष व संचालक विठ्ठलराव खारोडे, संचालिका सौ. अश्विनीताई खारोडे,
प्राथमिक विभागाचे अध्यक्ष व संचालक डॉ. विक्रम जोशी, संचालक विष्णूजी मल्ल, शिवम पाडिया, पुष्कर तागडे, ओमप्रकाशजी झुनझुनवाला,
तिन्ही विभागांचे पदाधिकारी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व पंचक्रोशीतील असंख्य हरिभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा भव्य हरिकीर्तन सोहळा शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, संपूर्ण परिसर भक्ती, संस्कार व अध्यात्माने भारावून गेला.