
तेल्हारा ता.प्रतिनिधी…नंदकिशोर नागपुरे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महत्त्वाकांक्षी ‘संघटन सृजन अभियाना’ अंतर्गत, महाराष्ट्र प्रदेश सेवादल काँग्रेसची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेत, पक्षाच्या निरीक्षकांनी जिल्हा व ब्लॉक स्तरावर प्रत्यक्ष भेटी देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेअंती सादर केलेल्या अहवालाची दखल घेत आणि महाराष्ट्र प्रदेश सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने, तेल्हारा येथील सहकार नेते श्री. नितीन रामेश्वर वानखडे यांची ‘तेल्हारा ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
नितीन वानखडे हे सध्या तेल्हारा येथील खरेदी-विक्री सहकारी संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. सहकार क्षेत्रातील त्यांचा गाढा अनुभव, जनसंपर्क आणि पक्ष संघटनेसाठी असलेली त्यांची निष्ठा पाहता, त्यांच्यावर ही मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीमुळे तेल्हारा व परिसरातील काँग्रेस सेवादल अधिक बळकट होऊन पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आपल्या निवडीची घोषणा होताच नितीन वानखडे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव ॲड. महेशदादा गणगणे, अकोला जिल्हा अध्यक्ष अशोकजी अमानकर, तेल्हारा तालुकाध्यक्ष गजाननजी वानखडे आणि सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांचे आभार मानले. पक्ष संघटना अधिक तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
नितीन वानखडे यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.