
तेल्हारा ता.प्रतिनिधी.नंदकिशोर नागपुरे
राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आलेल्या ‘पीएआय २.०’ (PAI 2.0) प्रगतीपुस्तकात अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापूर ग्रामपंचायतीने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. सन २०२३-२०२४ या वर्षातील कामगिरीच्या आधारे, ‘बी-दर्जा’ श्रेणीमध्ये दानापूर ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे.
८६.६६% गुणांसह जिल्ह्यात अव्वल
राज्य आणि केंद्र शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रशासन आणि ग्रामविकासाच्या विविध कडक निकषांवर आधारित या मानांकनात दानापूर ग्रामपंचायतीने ८६.६६% गुण मिळवले आहेत. पंचायत विकास निर्देशांकातील (PDI) या घवघवीत यशामुळे ग्रामपंचायतीच्या गतिमान कारभाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मान्यवरांच्या हस्ते गौरव
या यशाबद्दल जिल्हा परिषद अकोला येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात दानापूर ग्रामपंचायतीचा यथोचित गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविकांत पवार यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला सन्मानपत्र प्रदान करून विशेष सत्कार करण्यात आला.
सामूहिक प्रयत्नांचे फळ
दानापूरने मिळवलेले हे यश जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या यशाचे श्रेय सरपंच सपना वाकोडे, ग्रामविकास अधिकारी संजय उईके, तसेच गणेश तळोकार, धम्मपाल वाकोडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांना व परिश्रमाला दिले जात आहे. दानापूर ग्रामपंचायत आता महाराष्ट्रातील एक ‘आदर्श ग्रामपंचायत’ होण्याच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.